गया : बिहारमधील गया पोलिसांनी ५ अज्ञात व्यक्तिंवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विश्वास व्यक्त केला आहे की, आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील. बलात्कार प्रकरणातील एक व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलीस जोरदार कार्यरत झाले आहेत. या व्हिडिओत एका मुलगा एका मुलीवर बलात्कार करताना दिसत आहे. तसेच, त्याचे इतर मित्र त्याचे व्हिडिओ शूटींग करताना दिसत आहेत. व्हिडिओत आरोपींच्या बोली भाषेवरून हे आरोपी बिहारमधील मगध परिसरातील असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.
ही घटना जहानाबाद, गया, औरंगाबाद आणि अगरवल आदी परिसरापैकीच एखाद्या परिसरात घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, पीडितेवर एकाच आरोपीने बलात्कार केला आहे. मात्र, त्यावेळी घटनास्थळावर इतरही काही लोक उपस्थित होते. त्यापैकी काही जण हे व्हिडिओ शूटींग करत होते. तर, यांपैकीच एक व्यक्ती पीडितेला वाचवण्याचाही प्रयत्न करत असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
गया पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गया जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अज्ञात गुन्हेगारांवर पोलिसांनी भा. दं. स. कलम ३७६, ३५४ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हा व्हिडिओ पटना झोनमध्ये येणाऱ्या सर्व पोलीस स्थानकांना पाठवला आहे. तसेच, व्हिडिओतील आरोपींच्या चेहऱ्याचे स्क्रिन शॉटही पोलिसांनी काढले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गांभीर्याने तपास सुरू केला आहे.