निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : मध्य प्रदेशातील (madhya pradesh) सिहोर जिल्ह्यातील कुबेश्वर धाम (Kubereshwar Dham Sehore) येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. वाढत्या गर्दीपुढे प्रशासनानेही गुढघे टेकले आहेत. अशातच गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील (Maharashtra) एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी प्रचंड गर्दी झाली होती. रुद्राक्ष मिळण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे अनेकवेळा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या गर्दीमध्येच मालेगावच्या (Malegaon) एका महिलेचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे. तर तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.
भाविकांनी कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी गर्दीमध्ये रुद्राक्ष फेकले जात होते असा आरोप भाविकांनी केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. अनेक महिला, लहान मुले व वृद्धांना यामुळे त्रासाला सामोरे जावे लागले. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती असतानाच रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले. अनेक लोक रुद्राक्ष न घेता घरी परतले, असेही काहींनी सांगितले. दुसरीकडे गुरुवारी येथे सुमारे 10 लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील रुद्राक्ष महोत्सवाला भेट देणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.
मात्र या चेंगराचेंगरीत मालेगावच्या एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. मंगला कांडेकर असे या महिलेचे आहे नाव असून त्या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील रहिवासी आहेत. गर्दीत भोवळ येऊन आल्याने त्यांचा मृत्यू झाला .रुद्राक्ष घेण्यासाठी मालेगावातून हजारोच्या संख्येने भाविक कुबेरेश्वर धामला गेले होते. त्यामध्ये मंगला कांडेकर यांचाही सहभाग होता.
"महाराष्ट्रातील नाशिकमधील मालेगाव येथून आलेल्या मंगलाबाई (50) यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना चक्कर आल्याने त्या खाली पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. तर छत्तीसगडमधील भिलाई, राजस्थानमधील गंगापूर आणि महाराष्ट्रातील बुलढाणा येथून तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत," असे मंडी पोलीस स्टेशनचे एएसआय धरमसिंह वर्मा यांनी सांगितले.