केंद्र सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळतेय- सुप्रिया सुळे

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही. 

Updated: Sep 14, 2020, 11:55 AM IST
केंद्र सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळतेय- सुप्रिया सुळे title=

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. यामध्ये महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. त्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले की, सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. 

संसदेतील सर्व खासदारांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे- मोदी

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची फटका केवळ आपल्या देशालाच बसलेला नाही. जगभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या मुद्द्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, केंद्र सरकार अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या समस्येविषयी फार काही बोलताना दिसत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

दरम्यान, आज अधिवेशनला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी प्रश्नोत्तराचा तास वगळल्यावरून सरकारवर टीका केली. प्रश्नोत्तराचा तास हा सुवर्ण अवधी असतो. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीचे कारण देत सरकारने प्रश्नोत्तराचा तास रद्द केला. तुम्ही संसदेचे इतर सर्व कामकाज सुरु ठेवलेत केवळ प्रश्नोत्तराचा तास वगळलात. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहात, अशी टीका अधिर रंजन चौधरी यांनी केली.