1.3 Crore Cash And 4 Kg Silver Recovered from Car: मध्य प्रदेशमधील मंदसूरमधून पोलिसांनी 1.3 कोटी रुपये आणि 4 किलो चांदी जप्त केली आहे. एका कारमधून हा माल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाचा सध्या राज्यात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीशी काही संबंध आहे का या दृष्टीकोनातून पोलीस सध्या तपास करत आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल कसा जप्त केला यासंदर्भातील सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1.3 कोटी रुपये कॅश आणि दागिने सोमवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गाजवळ उभ्या केलेल्या एका कारमध्ये आढळून आली. नई आबादी पोलीस स्टेशनचे प्रमुख वरुन तिवारी यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "राष्ट्रीय महामार्ग 47 वर सोमवारी सांयकाळी ही कार आढळून आली. या कारमध्ये 3 प्रवासी होते. ज्यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. आम्ही त्यांच्याकडून जवळपास 1.3 कोटी रुपयांची कॅश आणि 4 किलो चांदी या गाडीमधून जप्त केली आहे. या प्रकरणात तपास सुरु आहे."
नई आबादी पोलीस स्थानकाचे प्रमुख अरुण तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गाडीमधून ही रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले त्या गाडीवर महाराष्ट्रातील नंबर प्लेट होती. "आम्हाला या गाडीमध्ये मोठ्याप्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही या गाडीचा पाठलाग केला आणि 1.3 कोटी रुपये, 4 किलो चांदी जप्त केली," असं तिवारी यांनी सांगितलं.
VIDEO | "As the Model Code of Conduct is underway, police are surveilling. A car with Maharashtra number plate was seen on the highway. We got the info about cash being in the car, so police chased it down and recovered around Rs 1.3 crore cash. Additionally, 4 kg of silver has… pic.twitter.com/0o5ndcrYi2
— Press Trust of India (@PTI_News) April 22, 2024
लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वीच हा मुद्देमाल हाती लागला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडलं असून पुढील टप्प्यातील मतदान असलेल्या मतदारसंघांमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 67.08 टक्के मतदान झालं. राज्यातील 6 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान झालं. शिधी, साहदोल, जबलपूर, मंडला, बालघाट आणि छिंदवारामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलं. या सहा मतदारसंघांपैकी छिंदवारामध्ये सर्वाधिक म्हणजे 79.18 टक्के मतदान पार पडलं. त्याखालोखाल बालघाटमध्ये 73.18 टक्के तर मंडलामध्ये 72.49 टक्के मतदान झालं. साहदलमध्ये 63.73, जबलपूरमध्ये 60.52 आणि शिधी मध्ये 55.19 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं आहे.
मध्य प्रदेशमध्ये एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. पुढील 3 टप्प्यांतील मतदान 26 एप्रिल, 7 मे आणि 13 मे रोजी पार पडणार आहे. मतमोजणी 4 जून रोजी पार पडणार आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण 29 लोकसभा मतदारसंघ आहेत. मतदारसंघाच्या संख्येनुसार मध्य प्रदेश हे देशातील सहावे मोठे राज्य आहे. या 29 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघ एससी आणि एसटी उमेदवारांसाठी राखीव आहेत.