काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा संभाळण्यास माजी हॉकीपट्टू तयार

राहुल गांधी यांची इच्छा असेल तर भोपाळमध्ये राहणाऱ्या असलम शेख यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ पडू शकते. 

Updated: Jun 7, 2019, 06:58 PM IST
काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा संभाळण्यास माजी हॉकीपट्टू तयार  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पार्टी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्ती कॉंग्रेस अध्यक्ष असावा असेही राहुल यांनी स्पष्ट केले. पण हा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाही. काँग्रेस पक्षातील कोणीही नेता ही जबाबदारी संभाळायला समोर येत नाही. पण आता माजी हॉकी खेळाडू ही जबाबदारी घेण्यास पुढे आले आहेत. असलम शेरखान असे या माजी हॉकी खेळाडुचे नाव आहे. त्यांनी भारतातर्फे ऑलम्पिक स्पर्धा खेळली असून राजकारणातील ते परिचयाचे नाव आहे. राहुल गांधी यांची इच्छा असेल तर भोपाळमध्ये राहणाऱ्या असलम शेख यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्ष पदाची माळ पडू शकते. 

असलम शेख हे केंद्रीय मंत्री होते आणि त्यांनी ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमचे प्रतिनिधित्व केले आहे. कॉंग्रेसने पराभवाचा सामना केला तेव्हाच मी यासंदर्भात पत्र लिहिल्याचे असलम सांगतात. जेव्हा राहुल गांधी यांनी पार्टी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि गांधी घराण्या व्यतिरिक्त कोणी अध्यक्ष बनावा अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा ही संधी असल्याचे मला वाटले असेही असलम सांगतात. 

काँग्रेसला याक्षणी साहसाची गरज आहे. अशावेळी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल. म्हणून मी हे पत्र लिहिल्याचे ते म्हणाले. जर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी राहायचे असेल तर ते राहु शकतात. पण त्यांना वाटत असेल की दुसरा कोणी योग्य वाटत असेल तर त्याचा सन्मान व्हायला हवा असेही असलम यांनी म्हटले आहे. जर नेहरू-गांधी परिवाराच्या बाहेर कोणास जबाबदारी द्यायची असेल तर मी ती मला द्या. मला दोन वर्षांसाठी ही जबाबदारी द्या. कॉंग्रेस पुन्हा एकदा राष्ट्रवादाशी जोडण्याची ही वेळ असल्याचेही असलम म्हणाले.