लोकसभा निवडणूक : मतदानाला गालबोट, ग्रेनेड हल्ला आणि ईव्हीएमची तोडफोड

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी  मतदानाला गालबोट लागले आहे. ग्रेनेड हल्ल्यासह दोन ठिकाणी मतदान यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे. 

ANI | Updated: May 6, 2019, 11:13 AM IST
लोकसभा निवडणूक : मतदानाला गालबोट, ग्रेनेड हल्ला आणि ईव्हीएमची तोडफोड title=
Pic Courtesy: ANI

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. आज सात राज्यात ५१ मतदारसंघात मतदान होत आहे. मतदानासाठी मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्यात. तर दुसरीकडे काही घटनांमुळे या मतदानाला गालबोट लागले आहे. दोन ठिकाणी मतदान यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे. तर काश्मीरमध्ये मतदान सुरू असतानाच पुलवामा येथे मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी व मृत झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, देशभरात पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी ११.६८ % मतदान झाले आहे.

केंद्रीय मंत्री आणि लखनऊमधील भाजप उमेदवार राजनाथ सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हा, कुणीही मतदानापासून वंचित राहू नका, असे आवाहन नागरिकांना केले. तर जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी रविवारीही शोपियान आणि पुलवामा येथे अनेक ठिकाणी दगडफेकीबरोबरच जाळपोळीच्या घटना घडल्या. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या. यात मतदान केंद्रावरील अनेक कर्मचारीही जखमी झाले. तर हिंसक जमावाने काही ठिकाणी सरकारी इमारतींना आगी लावल्या.  

दरम्यान, बिहारमधील गोपाळपुरमधील नयागाव मतदानकेंद्रावर EVM मशीनची तोडफोड करण्यात आली. तसेच छपरामध्ये रणजीत पासवान याने मतदान यंत्र फोडल्याप्रकणी अटक करण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचे उमेदवार अर्जुन सिंग यांच्यावर काही कार्यकर्त्यांकडून हल्ला केला. यामुळे येथे गोंधळाची परिस्थिती निर्मा झाली होती.