नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली असून या ठिकाणी अनेक दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये माजी पंतप्रधानांसहित दोन माजी मुख्यमंत्री आहेत. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, द्रमुक नेता दयानिधी मारन, ए राजा, कनिमोई, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंसचे फारूक अब्दुल्ला, उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर, भाजपाच्या हेमा मालिनी, बसपाचे दानिश अली यांसारखे दिग्गज रिंगणात आहेत. याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह देखील आपले नशिब आजमावत आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
छत्तीसगडच्या कांकेर मतदान केंद्र 186 मधील कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. तर पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला टांगलेला आढळून आला. या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात 10 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर हे मतदारसंघ येतात. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. रांगेत उभे राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सोलापूर आणि पंढरपूर येथे मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे मतदान काही काळासाठी थांबवण्यात आले होते. सोलापुरात पुन्हा मतदानास सुरुवात झाली आहे.
19 मार्चला जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार दुसऱ्या टप्प्यात 19 मार्चला 13 राज्यांतील 97 जागांवर मतदान होणार होते. पण त्रिपुरा आणि तामिळनाडुच्या वेल्लोर या जागांवर मतदान स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे 12 राज्यांच्या 95 जागांवर मतदान होईल.
लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक होत आहे. पहि्या टप्प्यात 11 एप्रिलला झालेल्या मतदानात 20 राज्यांच्या 91 जागांवर मतदान झाले. मतमोजणी 23 मे ला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तामिळनाडुच्या सर्व 39 पैकी 38 लोकसभा जागांसोबतच राज्यातील 18 विधानसभा जागांवर उपनिवडणूक होणार आहे. याशिवाय बिहारच्या 40 मधील पाच, जम्मू काश्मिरच्या सहापैकी दोन, उत्तर प्रदेशच्या 80 मधील आठ, कर्नाटकच्या 28 पैकी 14, महाराष्ट्राच्या 48 पैकी 10 आणि पश्चिम बंगालच्या 42 मधील 3 जागांवर मतदान होईल. या टप्प्यात आसाम आणि ओडीशाच्या पाच-पाच जागांवर मतदान होईल.