प्रशांत शर्मा झी २४ तास संगमनेर : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींनी विकासाच्या गप्पांचा फड रंगवला आहे. एकीकडे सत्ताधारी आश्वासनांची खैरात वाटत आहे. तर दुसरीकडे विरोधक अपेक्षापूर्ती न केलेल्या सरकारवर सडकून टीका करत आहेत. युती आणि आघाडी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण राज्यात असेही एक गाव आहे जिथे हंडाभर पाण्यासाठी लोकांचे हाल सुरु आहेत. संगमनेर तालुक्यात तर पाण्यासाठी गावकऱ्यांना दिव्य करावं लागत आहे.
संगमनेर तालुक्यात उघड्या बोडक्या डोंगरांतून कशीबशी वाट काढत महिलांना रोज पाण्यासाठी अशी पायपीट करावी लागते. दुष्काळ हा पायरवाडीच्या पाचवीलाच पुजलेला आहे. पण यंदा त्याची दाहकता जरा जास्तच जाणवत आहे. कारण यंदा जानेवारीपासूनच वाडीला पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
या ठिकाणी पाण्याचे सगळे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे डोंगर कपारीत झिरपणाऱ्या पाण्यावरच या गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागते. आठवड्यातून एकदा टँकरनं पाणी येतं चार दिवसही पूरत नाही असे स्थानिक सांगतात. बरं डोंगर कपारीतलं हे पाणी सहज मिळत नाही. त्यासाठी तासतास वाट पहावी लागते. ज्या रस्त्यावरुन आपण धड चालूही शकत नाही अशा रत्यावरुन या महिला दोन-दोन घागरी पाणी घेऊन जातात.
पाण्यासाठी अनेकदा मुलांना शाळा बुडवाली लागते.. घरच्या कर्त्या माणसांना हातचं काम टाकून पाण्यासाठी पायपीट करावी लगाते... पाच वर्ष झाल्यानंतर नेतेमंडळींना पायरवाडीची मतं दिसू लागलीत. पण या गावकऱ्यांची पाण्यासाठीची वणवण कधी दिसणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.