नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत जवळपास ६ कोटींची वाढ झालीय. वायनाड लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करताना त्यांनी ही माहिती दिली. २०१४ मध्ये राहुल गांधींची संपत्ती ९.४ कोटी होती तर आता त्यांच्याकडे १५.८८ कोटी संपत्ती आहे. ४० हजारांची रोकड, बँक खात्यात १७.९३ लाख, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स, कर्जरोखे, शेअर्समध्ये ५.१९ कोटींची गुंतवणूक आहे.
तर राहुल गांधी यांच्याकडे ३३३.३ ग्राम अर्थात २.९१ लाखांचं सोनं असल्याचा उल्लेखही त्यांनी अर्ज दाखल करताना केलाय. तसंच दिल्लीजवळील सुलतानपूर गावात १.३२ करोड रुपये किंमतीच्या फार्म हाऊसची काही प्रमाणात मालकीही त्यांच्याकडे आहे. गुरुग्राममधल्या सिग्नेचर टॉवरमध्ये त्यांच्याजवळ दोन कार्यालयंही आहेत. त्यांची किंमत ८.७५ करोड रुपये आहे.
एकूण १५.८८ करोडोंची संपत्ती असतानाही राहुल गांधींकडे स्वत:च्या मालकीची एकही गाडी नाही. तसंच त्यांच्यावर ७२ लाखांचं कर्जही आहे. पण त्यांच्याकडे केवळ ४० हजार रुपयांची कॅश आहे.
राहुल गांधींवर पाच खटले दाखल झालेले आहे. यांतील पाच खटले मानहानी प्रकरणातील आहेत. शिक्षणासंबंधी बोलायचं तर राहुल गांधी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजमधून डेव्हलमेंट स्टडीजमध्ये एमफीलची पदवी प्राप्त केलीय.
गुरुवारी केरळच्या वायनाड मतदार संघातून राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांची बहिण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यादेखील उपस्थित होत्या. वायनाडशिवाय राहुल गांधी उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. २००४ सालापासून या मतदार संघातून ते सलग निवडून आले आहेत.