मुंबई : LIC IPO Price Band: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या IPO ची वाट पाहत असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. यासोबतच IPO चा प्राइस बँडही समोर आली आहे. यासंदर्भात एलआयसी बोर्डाची मंगळवारी महत्वाची बैठक झाली. त्यात ही किंमत ठरवण्यात आली.
LIC ने त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) साठी 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. मंगळवारी ही माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, LIC आपल्या पॉलिसीधारकांना 60 रुपयांची सूट देणार आहे. तर किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना 40 रुपयांची सूट दिली जाईल.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) चा IPO 4 मे रोजी खुला होण्याची अपेक्षा आहे. हा इश्यू 9 मे रोजी बंद होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
फेब्रुवारीमध्ये, सरकारने दिग्गज विमा कंपनीतील आपले पाच टक्के स्टेक किंवा 316 कोटी शेअर्स विकण्याचे जाहीर केले होते. सरकारने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) या संदर्भातील कागदपत्रेही सादर केले. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आयपीओच्या नियोजनावरही झाला. गेल्या आठवड्यात, सरकारने इश्यूचा आकार पाच टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
IPO च्या माध्यमातून सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी LIC मधील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे सरकारला 21 हजार कोटी रुपये मिळतील. IPO वर आधारित, LIC चे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये आहे. पाच टक्के भागविक्रीच्या नियमातून सूट मिळण्यासाठी सरकारने सेबीला कागदपत्रेही दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सेबीच्या नियमांनुसार, 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या कंपन्यांना IPO मधील पाच टक्के हिस्सा विकणे आवश्यक आहे.