जम्मू : डिसेंबर ते फेब्रुवारी म्हणजे जणू भटकंतीचा काळ. वर्षातील हे दिवस काही ठिकाणी जाण्यासाठी अनेकांनाच प्रोत्साहित करतात. ज्यानंतर अनेकांचीच पावलं काही अशा ठिकाणांकडे वळतात जिथे सहसा आपलं जाणं होत नाही. अशाच काही ठिकाणांच्या यादीमध्ये अनेकांच्या बकेट लिस्टचा आढावा घेतल्यास एक नाव हमखास दिसतं. ते म्हणजे Chadar Trekचं.
'चादर ट्रेक....', नदीच्या पाण्यावर तापमान प्रचंड खाली गेल्यामुळे तयार होणाऱ्या एका जाड चादरीप्रमाणे भासणाऱ्या आवरणावरुन चालणं म्हणजेच हा लडाखमधील चादर ट्रेक. हवामानाच सेकंदाला होणारे बदल आणि ती आव्हानं पेलत पूर्ण केली जाणारी चादर ट्रेकची वाट अनेकांना हवीहवीशी वाटते. पण, यंदाच्या वर्षी मात्र या ट्रेकमध्ये काही आव्हानं येत आहेत. तशी ही आव्हानं काही नवी नाहीत, पण हा प्रसिद्ध चादर ट्रेक यंदाच्या मोसमात काही दिवसांसाठी बंद करण्यात आला होता. सध्या याचा काही भाग सुरु असला तरीही परिस्थिती पूर्ववत येण्याचीच प्रतिक्षा केली जात असल्याचं कळत आहे.
ट्रेकर्स ज्या बर्फाच्या आवरणावरुन त्यांची वाट काढत चालत असतात त्याच आवरणावर नदीचं पाणी आल्यामुळे ट्रेक बंद करावा लागला. भारतीय लष्कर आणि वायुदलाच्या सहाय्याने या ट्रेकमध्ये अडकलेल्या जवळपास ४१ ट्रेकर्सना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती टाईम्स ट्रॅव्हलने प्रसिद्ध केली आहे.
लेहचे जिल्हाधिकारी सचिन कुमार वैश्य यांनी अधिकृत पत्रक काढत या परिस्थितीविषयी माहिती दिली. 'Tibb आणि Neyraks कँपमध्ये नदीच्या जलस्तरात वाढ झाल्यामुळे काही ट्रेकर्स अडकले होते. ज्यांना आता Neyraks या गावात नेण्यात आलं आहे', असं ते म्हणाले.
अचानकच नदीचा जलस्तर वाढून, बर्फाच्या चादरीवरुन पाणी वाहू लागलं. ज्यामुळे तेथे असणाऱ्या ट्रेकर्सना Tibb आणि Neyraks दरम्यानच थांबावं लागलं होतं. या प्रसंगी जेव्हा ट्रेकर्सच्या दोन गटांशी संपर्क होत नसल्याची माहिती मिळाली तेव्हा लेहच्या स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्यासाठीचा इशारा मिळताच लगेचच शोधमोहिम आणि बचावकार्यास सुरुवात करण्यात आली.
पाहा : अडचणीत सापडलेल्या ७१ ट्रेकर्सची सुटका, भारतीय वायुसेनेची कामगिरी
येत्या काळात ट्रेक बंद होण्याचीच भीती
गेल्या काही वर्षांपासून चादर ट्रेकसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण, जागतिक तापमान वाढीचा फटका या ट्रेकलाही बसताना दिसत आहे. परिणामी येत्या काळात हा ट्रेक कायमस्वरुपी बंदही केला जाण्याची चिन्हं आहेत. जागतिक तापमान वाढीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवलं नाही, तर झंस्कार नदीचं अस्तित्वंच नाहीसं होण्याची भीती आहे. ज्यामुळे पुढच्या २-३ वर्षांमध्ये नदीचं पात्रंही दिसेनासं होऊ शकतं. परिणामी निसर्गाच्या एका अदभूत अविष्काराला अनेकजण मुकणार हे मात्र खरं.