मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश भागाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. धोक्याच्या पातळीच्या वर नद्या वाहत असून, अनेक गावांमध्ये या नद्यांचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक गावांतून गावकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर, देशाच्याही काही भागांमध्ये पुरामुळे हाहाकार माजल्याचं स्पष्ट होत आहे. याचा सर्वाधिक फटका हा केरळला बसला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पुरातून कुठे दाक्षिणात्य राज्य केरळ सावरत नाही, तोच यंदाच्या वर्षीसुद्धा पुरामुळे येथील काही गावांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी म्हणून बचाव दल प्रयत्नशील असून, त्यांच्याही प्रयत्कांची पराकाष्टा पाहायला मिळत आहे.
नुकतंच केरळमधील पल्लकड येथून एका ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेला बाहेर काढण्यात आलं. रोप वेच्या सहाय्याने या महिलेला एका दोरखंडाच्या आधारे पुरातून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. बचाव पथकातील जवानांनी त्यांच्या प्राणांची बाजी लावत हे कार्य केलं आणि पुन्हा एकदा कर्तव्यापरी तत्परतेने उभं राहण्याची त्यांच्या वृत्तीचं दर्शनच सर्वांनाच झालं.