VIDEO : प्री- वेडिंग फोटोशूटमध्ये होडी उलटली अन्....

सारंकाही पाण्यात.... 

Updated: Apr 21, 2019, 11:09 AM IST
VIDEO : प्री- वेडिंग फोटोशूटमध्ये होडी उलटली अन्....  title=

तिरुवअनंतपूरम : 'जिंदगी मे प्यार एक बार होता और शादी भी...' हे असे संवाद चित्रपटांमध्ये वारंवार ऐकायला मिळतात. पण, मुळात या संवादांना आणि चित्रपटांना गांभीर्याने घेणारा असाही एक वर्ग आहे. ज्याचा अवलंब करत दैनंदिन आयुष्यालाही काहीसा फिल्मी टच देण्याचा अनेकांचाच प्रयत्न असतो. असेच प्रयत्न सर्रास केले जातात ते म्हणजे प्री- वेडिंग फोटोशूटमध्ये. प्री- वेडिंग, म्हणजेच लग्नाच्या आधी प्रेमी युगुलं त्यांच्या नात्याचे काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद करु पाहतात. त्यातही वेगळेपण आणण्यासाठी अनेकजण आग्रही असतात. पण, हेच वेगळेपणं काही वेळेस महागात पडतं आणि सारेच कष्ट पाण्यात जातात. हो...... पाण्यातच जातात!

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे. 'द वेड प्लॅनर वेडिंग स्टुडिओ' यांनी सोशल मीडियावर एका प्री- वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये कालत्मकता किंवा काहीतरी हटके करण्याच्या नादात कशी फजिती झाली हे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालं असून, अनपेक्षितपणे केरळातील ही जोडीही प्रकाशझोतात आली आहे. तिरुवल्ला येथील तिजीन थांकचेन आणि चंगनाचेरी येथील सिल्पा हे ६ मे रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी कदंमनिता येथील पथनमथ्थिता येथे पंबा नदीच्या पात्रात प्री-वेडिंग फोटोशूट केलं. काही सुरेख फोटो टीपल्यानंतर, आणखी एका फोटोसाठी म्हणून फोटोग्राफरनेही एक वेगळी शक्कल लढवली. 

फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार तिजीन आणि सिल्पा यांना एका होडीत बसायचं होतं, त्यानंतर त्यांचा एक फोटो टीपला जाणार होता. पण, टेक म्हटल्यानंतर त्यांनी फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार पोझ देण्यास सुरुवात केली आणि दोघांचाही तोल गेला. बस्स....! पुढे काय, होडी उलटून दोघंही पाण्यात पडले. अर्थात तो भाग जास्त खोल नसल्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. पण, त्यावेळी तेथे एकच हशा पिकला. 

मुख्य म्हणजे हे सारंकाही फोटोग्राफरने आधीच ठरवलं होतं. पण, ज्या जोडप्याला मात्र याची काहीच कल्पना नव्हती अशी माहिती वेडप्लॅनर्सच्याच टीममधील बिन्सी निर्मलन याने दिल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केली. प्रथमत: फोटोशूटसाठी आलेल्या त्या जोडीलाही हा एक लहानसा अपघात असल्याचं वाटलं. पण, हे ठरवून करण्यात आल्याचं कळताच त्यांनाही झालेल्या घटनेवर हसू आवरलं नाही. 

लग्नापूर्वीच झालेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे तिजीन आणि सिल्पाच्या या सहजीवनाची सुरुवात एका अनोख्या आणि तितक्याच सुरेख अंदाजात झाली आहे, हे त्यांचं प्री- वेडिंग फोटोशूट पाहून लक्षात येत आहे. त्यामुळे खरोखरंच प्री- वेडिंग फोटोशूट म्हणजे...It`s Fun.....!