नवी दिल्ली: भारतीय रेल्वे सातत्याने आपली सेवा आणि तंत्रज्ञान विकसित करत आहे. आजचा दिवस रेल्वेसाठीही ऐतिहासिक असणार आहे. आज 160 किमी प्रति तास वेगाने दोन ट्रेन एकमेकांच्या दिशेने धावणार आहेत. यापैकी एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
रेल्वे आज स्वदेशी ट्रेन टक्कर संरक्षण तंत्रज्ञान 'कवच' ची चाचणी घेणार आहे. ही चाचणी सिकंदराबाद येथे होणार आहे. यामध्ये दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांच्या दिशेने धावतील. मात्र 'कवच'मुळे या दोन गाड्यांची टक्कर होणार नाहीत. याबाबतची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सनथनगर-शंकरपल्ली मार्गावरील या प्रणालीच्या ट्रायल रनचा भाग म्हणून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सिकंदराबादला पोहोचतील.
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर रेल्वे मंत्रालयाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारतीय रेल्वेने विकसित केलेले हे कवच तंत्रज्ञान जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित ट्रेन टक्कर संरक्षण प्रणाली असल्याचे मानले जाते. या तंत्रज्ञानामुळे रेल्वेला 'शून्य अपघात' हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होणार आहे.
लाल सिग्नल ओलांडताच ट्रेनला आपोआप ब्रेक लागेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, पाच किलोमीटरच्या परिघात सर्व गाड्या थांबतील. याशिवाय मागून येणार्या ट्रेनसाठीही हे कवच संरक्षण करेल.
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरकडून अशीच चूक झाल्यास कवच प्रथम ऑडिओ-व्हिडिओद्वारे अलर्ट करेल. प्रतिसाद न मिळाल्यास ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक ब्रेक लावले जातील. कवच तंत्रज्ञान जीपीएस, रेडिओ फ्रिक्वेन्सी या प्रणालींवर काम करेल.