बंगळुरु : कर्नाटकच्या रणसंग्रामात आज ४ वाजेपर्यंत भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी ही भाजपची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत सत्ताधारी भाजपला दणका दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा आज बहुमत सिद्ध कसं करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
भाजपकडे संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्याने काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आजच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सत्ताधारी भाजपला दिलेत. कर्नाटकाच्या मुख्यंमंत्रीपदाची शपथ घेऊन जेमतेम २४ तास पूर्ण होत असताना येडियुरप्पांच्या खुर्चीवर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे. तर आज विधानसभेत बहुमत सिद्ध करू असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, कर्नाटकातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे येडीयुरप्पां यांच्या वरुन वाद सुरु असतानाच आता हंगामी सभापती पदावरुनही काँग्रेस आक्रमक झालीय. भाजपचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष के जी बोपय्या यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. राज्यपालांनी के जी बोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिलीय. अनेक ज्येष्ठ आमदार असतानाही त्यांना डावलून बोपय्यांना अध्यक्ष केल्यामुळे काँग्रेस संतप्त झालीय. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी पुन्हा काँग्रेसने धाव घेतलीय.
सर्वोच्च न्यायालयानं सर्वात ज्येष्ठ आमदाराला अध्यक्षपदी बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याचे पालन न केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. या संदर्भातील सुनावणी ही सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.