आईच्या गर्भात असतानाच कारगिलमध्ये वडिलांना वीरमरण, 20 वर्षांनंतर त्यांच्याच पोस्टवर भरती

Kargil Vijay Diwas 2023: आईच्या गर्भात असताना वडील शहीद, 20 वर्षांनंतर वडिलांच्या जागीच मुलगा सैन्यात भरती झाला, वाचा संघर्षाची कहाणी

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 26, 2023, 12:24 PM IST
आईच्या गर्भात असतानाच कारगिलमध्ये वडिलांना वीरमरण, 20 वर्षांनंतर त्यांच्याच पोस्टवर भरती title=
kargil vijay diwas after martyrdom of her husband Mother sent her son to indian army

Kargil Vijay Diwas: कारागिल युद्धात जवान लेखराम हे शहीद झाले. त्यावेळी त्यांची पत्नी दोन महिन्यांची गर्भवती होती. ज्या काळात साथीदाराची खरी गरज असते तोच आधार तिच्याकडून काळाने हिरावून घेतला. मात्र लेखराम यांची पत्नी कृष्णा देवी यांनी न डगमगता या परिस्थीतीत झुंज दिली. कृष्णा देवी यांना मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतरच त्यांनी मुलाला सैन्यात भरती करायचे अशी मनाशी खुणगाठ बांधली. देशाचे रक्षण करताना पती शहीद झाला तरीदेखील त्या माऊलीने हिम्मत दाखवत मुलालाही भारतीय सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न दाखवले. आज वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुलगा सैन्यात दाखल झाला आहे. 

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्यात दाखल 

मुलगा गर्भात असतानाच कृष्णादेवी त्याला सैनिकांच्या व वडिलांच्या पराक्रमांच्या गोष्टी सांगत असे. जन्मानंतरही त्याच्या आईने त्याला सैन्यात दाखल होण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलानेही वडिलांचा देशासाठीचा त्यागाचा मान राखत सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. आज वयाच्या 20व्या वर्षी कृष्णादेवी यांचा मुलगा बटालियन अल्फा कंपनी, ग्रेनेडिअर १८ या तुकडीत शिपायी पदावर कार्यरत आहे. सध्याच्या स्थितीत पिथौरागड, कालापानी नावाच्या ठिकाणी चीन बॉर्डरवर देशाची सेवा करत आहे. 

सुट्टी संपवून ड्युटीवर गेले अन् पुन्हा परतलेच नाहीत

कृष्णा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल 1999 रोजी त्यांचे पती सुट्टीनंतर ड्युटीवर तैनात झाले होते. घरातून निघताना त्याने लवकर येण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 3 जुलै 1999 रोजी ते शहीद झाल्याची खबर आली. जेव्हा त्यांचे पार्थिव घरी आले तेव्हा मी त्यांना ओळखूही शकले नव्हते, अशी आठवण कृष्णा देवी यांनी सांगितली आहे. 

कुटुंबीयांनी दिला मदतीचा हात

लेखाराम शहीद झाले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा कर्मपाल आठ वर्षांचा होता, मोठी मुलगी पूनम 6 वर्षांची तर छोटी मुलगी मनीषा २ वर्षांची होती. तर, पत्नी दोन महिन्यांची गर्भवती होती. त्यानंतर सरकारकडून त्यांच्या परिवाराला गॅस एजन्सी देण्यात आली. पती शहीद झाल्यानंतर कृष्णादेवी यांना त्यांचे मोठे दीर आणि जाऊबाईंनी मदतीचा हात दिला. आज त्यांचा मोठा मुलगा गावचा सरपंच आहे तर धाकटा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्यात दाखल झाला आहे. खडतर काळ सरला असला तरी कृष्णादेवी अजूनही शहीद पतीच्या आठवणीत जगतात.