गजबजलेल्या जम्मू बस स्थानकात ग्रेनेड हल्ला; १८ जण जखमी

या स्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर खाली केला आहे.

Updated: Mar 7, 2019, 02:59 PM IST
गजबजलेल्या जम्मू बस स्थानकात ग्रेनेड हल्ला; १८ जण जखमी title=

श्रीनगर: पुलवामा हल्ल्यानंतर हायअलर्ट असलेला जम्मूचा परिसर गुरुवारी स्फोटाने हादरला. या स्फोटात तब्बल १८ जण जखमी झाले आहेत.  प्राथमिक माहितीनुसार, जम्मू बस स्थानकाच्या परिसरात हा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एका व्यक्तीने बसमध्ये ग्रेनेड फेकल्यामुळे हा स्फोट झाला. या घटनेनंतर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हा परिसर खाली करण्यात आला असून सध्या पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत आहे. दरम्यान, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे जम्मू-काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.

 

दरम्यान, शुक्रवारी पहाटे जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या हंडवाऱ्याजवळ क्रालगुंड गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला ठार केलंय. हंदवाडाच्या बांदरपेई भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरू झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये आर्मीच्या पेट्रोलिंग युनिटवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला... दहशतवाद्यांना प्रत्यूत्तर देताना सुरक्षा दलानं या दहशतवाद्याला कंठस्नान घातलं.