Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णन

Jammu and Kashmir Accident : हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघातानंतर जम्मू काश्मीरमधून घटनास्थळाची काही दृश्य समोर आली आहेत. पाहताच उडेल थरकाप...   

सायली पाटील | Updated: Jun 10, 2024, 08:22 AM IST
Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णन  title=
Jammu Kashmir Bus Attack Morning visuals from the terror attack site in Reasi video casualties noted

Jammu and Kashmir Accident : जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी कथित स्वरुपात दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाल्यानं बस दरीत कोसळली. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यानंतर 9 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 30 जण गंभीर जखमी असल्याची माहिती रियासीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. (काही ठिकाणी मृतांचा आकडा 10 वर गेल्याचं सांगण्यात येत आहे.) दिलीय. 

रियासी जिल्ह्यातील पौनी भागात, कटरा यात्रेला जाणाऱ्या बसला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली. हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य हाती घेत 40हून अधिक प्रवाशांना बाहेर काढलं. यानंतर घटनास्थळी पोलीस, लष्कर आणि CRPF यांनी एकत्रित सुरक्षा दलाच्या तात्पुरत्या स्वरुपात ऑपरेशन हेडक्वार्टरची स्थापना केली. तसंच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी व्यापक ऑपरेशन सुरु केलं आहे. 

'लाल मफलर गुंडाळून आलेले दहशतवादी'

रविवारी सायंकाळी साधारण 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास 53 प्रवाशांची आसनक्षमता असणाऱ्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला त्यावेळी करण्यात आला जेव्हा बस, तेरयाथ गावापाशी असणाऱ्या शिवखोरी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माता वैष्णोदेवी मंदिराच्या दिशेनं निघाली होती. 

PTI च्या माहितीनुसार बसनं प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं हल्ल्यासमयी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. बसवर जवळपास 25 ते 30 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या आणि ही बसल दरीत जाऊन कोसळली. दुसऱ्या एका प्रवाशाच्या माहितीनुसार लाल रंगाचं मफलर गुंडाळून आलेल्या हल्लोखोरानं बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. बस चालकाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या माहितीनुसार, 'मी बस चालकाच्या शेजारीच बसलो होतो. तितक्यातच एक वाहन जंगलातून खालच्या दिशेला आलं. मी पाहिलं, की चेहरा आणि डोकं झाकलेल्या एका व्यक्तीनं बससमोर येऊन बेछूट गोळीबार करण्यास  सुरुवात केली'. अपघातानंतर या बसचा एक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये ही बस वळणाच्या रस्त्यावरून जाताना दिसत आहे. 

 

बसवरील हल्ल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्यानं बस दरीत जाऊन कोसळली आणि यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू ओढावला. दरम्यान घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरु असून, सोमवारी सकाळी एएनआय या वृत्तसंस्थेनं घटनास्थळाची काही दृश्य व्हिडीओ स्वरुपात जारी केली. जी पाहून हल्ला आणि त्यानंतरचा अपघात किती भीषण स्वरुपाचा होता हे पाहायला मिळालं.

दशहतवाद्यांनी लक्ष ठेवून हल्ला केलेल्या या धक्कादायक प्रकरणानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला असून, शिवखोडी मंदिर, वैष्णोदेवी मंदिर इथं सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या घनदाट जंगलाच्या या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहिमसुद्धा हाती घेतली आहे. अधिकृत माहितीनुसार अद्यापही काही मृतकांची ओळख पटली नसली तरीही ते उत्तर प्रदेशातील असल्याचं म्हटलं जात आहे.