नवी दिल्ली : जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू पदी प्राध्यापक नजमा अख्तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या माध्यमांतून नियुक्ती करण्यात आली. जमियाच्या आजवरच्या इतिहासात कुलगुरूपदी महिला प्राध्यापक नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्राध्यापक अख्तर या जमियाच्याच नव्हे तर दिल्लीतल इतर कोणत्याही केंद्रिय विश्वविद्यालयाच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि जामियासाठी ही ऐतिहासिक घटना आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखप्राप्त असलेल्या नजमा अख्तर यांना चार दशकांच्या शैक्षणिक नेतृत्वाचा अनुभव आहे. यासह एनआयपीएमधील १३० देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रिय शैक्षणिक प्रसारक पाठ्यक्रमाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे. तसेच प्रयागराज येथे शैक्षणिक व्यवस्थापक विकसित करण्यासाठी राज्यस्तरिय व्यवस्थापन संस्था त्यांनी स्थापन केली.
अलिगड मुस्लिम विश्वविद्यापीठात त्यांनी परिक्षा नियंत्रक तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमाचे संचालकपदही त्यांनी भुषवले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रिय मुक्त विद्यापीठात त्यांनी बऱ्याच राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय आंतर शिक्षण अभ्यासक्रमांची निर्मिती केली. अलिगड विद्यापीठाच्या सुवर्ण पदकप्राप्त असलेल्या नजमा अख्तर यांना विविध आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. तसेच कॉमनवेल्थ स्कॉलरशिपनेही त्यांना गौरवण्यात आले आहे.
विकसित आणि विकसनशिल देशांसाठी विविध विषयांवर त्यांनी एकत्रित संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा जमियाला फायदाच होईल, असे जमियातील इतर प्राध्यापकांचे मत आहे.