नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरच्या अवंतीपोरा (Awantipora) भागाजवळ गोरीपोरामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आत्मघाती हल्ला (Suicidal Attack) करण्यात आला. हा हल्ला सीआरपीएफ (CRPF) च्या वाहनांना निशाण्यावर घेत आयईडी स्फोटच्या (IED Blast) साहाय्यानं हा हल्ला घडवून आणण्यात आला. हा हल्ला झाला तेव्हा जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे रवाना जात होता. न्यूज एजन्सी राऊटर्सनं (Reuters) दिलेल्या माहितीनुसार, या हल्लात आत्तापर्यंत ४४ जवानांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याचा एक व्हिडिओही जैश ए मोहम्मदकडून जारी करण्यात आलाय.
- सेनेच्या ताफ्यात (convoy) ७८ वाहनांचा समावेश होता. यामध्ये तब्बल २५०० जवान प्रवास करत होते
- बसमध्ये सीआरपीएफच्या ७६ बटालियनचे जवान होते
- हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना तब्बल ३५० किलो आयईडी स्फोटकांचा वापर केला होता. सीआरपीएफचा ताफा जात असलेल्या एका कारमध्ये ही स्फोटके भरून ठेवण्यात आली होते
- श्रीनगरपासून अवघ्या ३० किलोमीटर दूर अंतरावर अवंतीपोरा बागात दहशतवाद्यांनी या ताफ्यावर पहिल्यांदा गोळीबार केला. स्फोटकांनी भरलेली एक 'एसयूव्ही' गाडी जवानांच्या एका बसवर धडकली... आणि मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात एका बसचे आणि त्यातून प्रवास करणाऱ्या जवानांचे अक्षरश: तुकडे-तुकडे उडाले
- सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांना निशाण्यावर घेत हा आयईडी स्फोट घडवून आणण्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा हात होता. या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय
- हा एक आत्मघातकी हल्ला होता. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद उर्फ वकास कमांडो यानं हा हल्ला घडवून आणला. धक्कादायक म्हणजे, आदिल हा अवघ्या २१ वर्षाचा तरुण काश्मीरचा स्थानिक रहिवासी होता.
- जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ल्याचा एक व्हिडिओही जारी केला आहे
- जैश ए मोहम्मदनं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, दक्षिण काश्मीच्या काकपोरा भागात राहणारा वकास जैशच्या झेंड्यासमोर बसलेला दिसतोय. त्याच्यासमोर ग्रेनेड आणि अत्याधुनिक रायफल ठेवलेल्या दिसत आहेत. या व्हिडिओची सुरुवात करताना वकास म्हणतोय, 'जेव्हापर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचेल तेव्हापर्यंत मी जन्नतमध्ये मजा करायला पोहचलो असेल. मी जैश ए मोहम्मदमध्ये दहशतवाद्याच्या रुपात एक वर्ष काम केलं आणि काश्मिरच्या जनतेसाठी हा माझा शेवटचा मॅसेज असेल'.
- या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे
- धक्कादायक म्हणजे, गुप्तचर विभागाने ८ फेब्रुवारी रोजी आईडी हल्ल्याची शक्यता व्यक्त करून काळजी घेण्याची सूचनाही केली होती. लष्कराचा ताफा जात असलेल्या भागाची तपासणी केल्याशिवाय ताफा पुढे जाऊ नये, असा तातडीचा पण स्पष्ट इशारा यामध्ये देण्यात आला होता
- जम्मू काश्मीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एका खाजगी ट्विटर अकाऊंटवर अपलोड करण्यात आलेली गुप्त सूचना सुरक्षा एजन्सीलाही दिली होती. यामध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं सुरक्षा दलावर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली होती. यामध्ये, एका ट्विटर अकाऊंटवरून अपलोड करण्यात आलेला एक केवळ ३३ सेकंदाचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये दहशतवादी सोमालियात जवानांवर हल्ला करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, या व्हिडिएओत ज्या पद्धतीनं दहशतवादी हल्ला होताना दिसतोय तसाच हल्ला गुरुवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर करण्यात आला
- याआधी अशा पद्धतीनं अनेक आत्मघातकी दहशतवादी हल्ले सीरिया आणि अफगानिस्तानात घडवून आणले गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा तोच जुना पॅटर्न पुन्हा एकदा वापरलाय
- या हल्ल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षेच्या मुद्यावर मंत्रीमंडळाची एक बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
- गृहमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. इथे ते सुरक्षेविषयी माहिती घेतील. गुरुवारी त्यांनी या घटनेची निंदा करत 'या हल्ल्याचा बदला घेतला जाईल' असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं होतं.
- जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक हेदेखील जम्मूहून श्रीनगरला दाखल होणार आहेत.
- अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत खोऱ्यातील इंटरनेट सेवा सध्या बंद केलीय.