नवी दिल्ली : इस्रोनं अंतराळात मानवी मोहीम आखण्याची तयारी सुरू केलीये..यामध्ये सर्वाधिक लक्ष देण्यात आलंय ते अंतराळवीरांच्या सुरक्षेवर... क्रू एस्केप सिस्टिम या नव्या प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आलीये. गुरूवारी श्रीहरीकोटाच्या अंतराळ प्रेक्षपण तळावर या प्रणालीची चाचणी यशस्वी झालीये. इस्रोच्या क्रू एस्केप सिस्टिमची ही चाचणी २५९ सेकंद चालली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळकेंद्रात ही चाचणी झाली. लाँचिंगनंतर टेस्ट मॉड्यूल काही काळ हवेत राहिलं. त्यानंतर पॅराशूटच्या मदतीनं श्रीहरीकोटापासून ३ किलोमीटर अंतरावर बंगलच्या उपसागरात हे मॉड्यूल उतरलं. ३०० सेन्सर्सच्या मदतीनं या चाचणीच्या प्रत्येक पैलूचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. या चाचणीमुळे इस्रोनं मानवी अंतराळमोहीमेच्या दिशेनं पहिलं दमदार पाऊल टाकलंय.
लाँचिंग पॅडवरून यान सुटताच अपघात झाला, तर अंतराळवीरांना सुरक्षीत पृथ्वीवर आणण्याचं काम ही यंत्रणा करेल.
अंतराळयानात स्फोट झाल्यास अंतराळवीर बसलेला भाग वेगळा होईल.
त्यामध्ये असलेलं इंजिन सुरू होईल आणि सर्वप्रथम अंतराळवीरांच्या केबीनला अपघातग्रस्त यानापासून दूर घेऊन जाईल.
त्यानंतर काही सेकंदांनी केबीनवर असलेले पॅराशूट उघडतील आणि केबिन सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतेल.
अंतराळयानात असलेल्या इंधनाचा स्फोट झाला तर त्यात अंतराळवीरांचा अंत होऊ शकतो... या यंत्रणेमुळे ही दुर्घटना टळू शकेल.