घरबसल्या जिंका १ लाख रुपये, मोदी सरकार देतंय संधी

वाचा काय आहे ही संधी...

Updated: Jun 7, 2020, 06:32 PM IST
घरबसल्या जिंका १ लाख रुपये, मोदी सरकार देतंय संधी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशातील, जगातील स्थिती पाहता यावर्षी जागतिक योग दिवस संपूर्ण जगात डिजिटल प्लॅटफॉर्मवर साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक परिषदचे (ICCR) अध्‍यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आयुष मंत्रालयासोबत आयोजित एका परिषदेत याबाबत माहिती दिली. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी जागतिक योग दिनी कोणत्याही जनसभेचं आयोजन करण्यात येणार नाही. त्यामुळे आयुष मंत्रालयाकडून जनतेला आपल्या कुटुंबियांसह घरातच योगाभ्यास करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना 'MyLifeMyYoga' या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेद्वारे आयुष मंत्रालय आणि आयसीसीआर योगाबद्दल जागरुकता वाढवण्यास आणि लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या स्पर्धेबाबत लोकांचा उत्साह वाढला असल्याचं, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितलं. योग संस्था, योग स्टुडिओ, योग प्रोफेशनल्स यासारख्या सर्वांना, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह विविध प्लॅटफॉर्मवरुन ब्लॉगिंग स्पर्धेविषयी जागरुक केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कसा कराल अर्ज -

ही ब्लॉगिंग स्पर्धा MyGov.gov.in सारख्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु झाली आहे. 15 जून 2020 रोजी ही स्पर्धा संपणार आहे. त्यानंतर विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल. व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी, स्पर्धकांकडून तीन श्रेणी अंतर्गत अर्ज दिले जाऊ शकतात. युवा-18 वर्षाखालील, प्रोढ-18 वर्षांवरील आणि योग प्रोफेशनल सामिल होऊ शकतात. त्याशिवाय पुरुष आणि महिला स्पर्धकांसाठी या श्रेणी वेग-वेगळ्या असतील. याप्रमाणे एकूण सहा श्रेणी असणार आहेत. 

या स्पर्धेत भारतातून भाग घेणाऱ्यांसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक असणार आहेत. प्रथम स्पर्धकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय स्पर्धकासाठी 50 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर भारताबाहेरील स्पर्धकांसाठी 2500 डॉलर, 1500 डॉलर आणि 1000 डॉलर असणार आहेत.