साबणाचा शोध लागला नव्हता, तेव्हा कपडे धुण्यासाठी वापरली जायची 'ही' खास पद्धत

कदाचित हा प्रश्न तुम्हाला जास्त विचार करायला लावेल. पण यामागचं उत्तर रंजक आहे.

Updated: Mar 22, 2022, 09:26 PM IST
साबणाचा शोध लागला नव्हता, तेव्हा कपडे धुण्यासाठी वापरली जायची 'ही' खास पद्धत title=

मुंबई : आपण दररोज अंघोळ केल्यानंतर किंवा दिवसातून दोन ते तीन वेळा गरजेनुसारकपडे बदलतो. हे कपडे आपण धुण्यासाठी टाकतो आणि हे खराब झालेले कपडे साबनाच्या मदतीने स्वच्छ केले जातात. ज्यामुळे आपण हे कपडे सुकल्यानंतर पुन्हा वापरतो. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की, जेव्हा साबणाचा शोध लागला नव्हता किंवा साबण हा प्रकार भारतात आला नव्हता, तेव्हा लोक कसे कपडे धुवायचे? कदाचित हा प्रश्न तुम्हाला जास्त विचार करायला लावेल. पण यामागचं उत्तर रंजक आहे. चला तर मग आपण जाऊन याचं उत्तर जाणून घेऊया.

सुरुवातीला लोक रीठाच्या सालीपासून निघणाऱ्या फेसाचा कपडे साफ करण्यासाठी वापर करायचे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु आजही महागडे आणि रेशमी कपडे स्वच्छ करण्यासाठी रीठाचा वापर केला जातो. तसेच केस धुण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

भारतात अजूनही काही लोकं केस धुण्यासाठी रीठाचा वापर करतात. रीठा वापरल्याने कोणत्याही केमिकल्स शिवाय केस धुतले जातात, याच्यातील नैसर्गीक तत्वामुळे लोक याचा केस धुण्यासाठी वापर करु लागले आहेत.

परंतु रीठा वापरणं सगळ्यांनाच शक्य नसल्याने किंवा जवळपास रीठा उपलब्ध नसल्याने अनेक लोक कपडे धुण्यासाठी गरम पाणी वापरायचे. ते आपले खराब कपडे पाण्यात टाकून ते ओले करायचे. त्यानंतर त्याच्यावर दगड मारून त्याला स्वच्छ करायचे. असे म्हटले जाते की, धोबीघाटात आजही जुन्या पद्धतीचे साबणाशिवाय कपडे धुतले जातात.

रीठाचा वापर कसा केला जायचा?

महागड्या आणि मऊ कपड्यांसाठी रीठाचा वापर केला जायचा. पूर्वी रेठाची फळे कपडे धुण्यासाठी पाणी घालून गरम केली जात होती. यातून फेस तयार होऊ लागायचा आणि नंतर त्यामधील फेस काढून तो कापडावर टाकला जायचा, ज्यानंतर तो कपडा दगड किंवा लाकडावर घासला जायचा.

यामुळे कपड्यांची घाण तर साफ होतेच, शिवाय कपडे जंतूमुक्तही होतात. तसेच हे नैसर्गिक असल्याने शरीरावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया होत नाही.

तसेच जुन्या काळात कपडे वाळूनेही स्वच्छ केले जात होते. वाळू ही एक प्रकारचं खनिज आहे. त्यात सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट असते. ही पांढऱ्या रंगाची पावडर पाण्यात मिसळून त्यात कपडे भिजवले जायचे आणि नंतर काही वेळाने कपडे, त्यातून बाहेर काढले जायचे.

माहितीसाठी

भारतात प्रथम एका ब्रिटीश कंपनीने साबण आणला आणि या कंपनीचं नाव आहे लीबर ब्रदर्स.