आंबा खाल्ल्याने 23 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू; रुग्णालयात 4 दिवस देत होती मृत्यूशी झुंज

Woman Died After Eating Mango: या 23 वर्षीय विवाहित महिलेने रात्रीचं जेवण केल्यानंतर आंबा खाल्ला होता. मात्र त्यानंतर या महिलेला त्रास होऊ लागला. आधी तिला स्थानिक डॉक्टरने औषधं दिली मात्र नंतर तिला चक्क असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 19, 2023, 08:46 AM IST
आंबा खाल्ल्याने 23 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू; रुग्णालयात 4 दिवस देत होती मृत्यूशी झुंज title=
4 दिवस देत होती मृत्यूशी झुंज (प्रातिनिधिक फोटो)

Woman Died After Eating Mango: मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका 23 वर्षीय महिलेचा फारच रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार राजेंद्र नगर परिसरामध्ये घडला आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार, तिने आंबा खाल्ल्यानंतर तिची प्रकृती खालावली. यानंतर या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

4 दिवस मृत्यूशी झुंज

मरण पावलेल्या महिलेचं नाव अर्जना अलेरिया असं आहे. अर्चना ही शहरातील बिजापूर भागात वास्तव्यास होती. अर्चनाला 8 जुलै रोजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र 4 दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. अर्चनाच्या मृत्यूनंतर तिचे सासरे बन्सीलाल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिने आंबा खाल्ला होता. आंबा खाल्ल्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आलं. तिला काही गोळ्या-औषधं देण्यात आली. मात्र घरी आल्यानंतर काही वेळात अर्चनाला चक्कर येऊ लागली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अर्चनाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, तिने खाल्लेल्या आंब्यावर विषारी घटक होते. याच विषामुळे तिची प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

नातेवाईकांचा जबाब नोंदवला

या प्रकरणामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह चौहान यांनी अर्चनाच्या ऑटोप्सी रिपोर्टनंतरच तिच्या मृत्यूचं कारण कळू शकेल असं म्हटलं आहे. पोलिसांनी अर्चनाच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेतला आहे. 

आंबे पिकवण्यासाठी वापरतात रसायन

आंबा हा त्याच्या चवीसाठी ओळखला जात असला तरी त्यामध्ये अनेक पोषक तत्वं असतात. फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए बरोबरच अनेक पोषक घटक आंब्यात असतात. हे सर्वच घटक आरोग्यासाठी फायद्याचे असतात. आंब्याचा ताजेपणा टिकून राहावा, तो लवकर खराब होऊ नये यासाठी तसेच फळाचा आकार वाढवण्यासाठी अनेकजण रासायनिक पद्धतीचा वापर करतात. यासाठी विषारी रसायनं वापरली जातात. या रसायनांमुळे मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. रसायने वापरुन पिकवलेले आंब्यांच्या माध्यमातून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंबे पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या दुष्परिणामांबद्दल भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) स्पष्टपणे सूचना आणि माहिती दिलेली आहे. आंबे विषारी आहेत की नाही याची चाचणी करण्याचे सोपे मार्गही एफएसएसएआयने सुचवले आहेत.

आंबाच नाही ही फळंही रसायने वापरुन पिकवतात

रसायनांचा वापर करुन पिकवलेल्या आंब्यांचा रंग, आकार आणि चव नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यांप्रमाणे नसतात. वरवर पाहता कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे नैसर्गिक आंब्यासारखेच दिसतात. मात्र रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांचा शरीरावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. आंबा कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी सामान्यपणे कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. आंब्याबरोबरच केळी, पपई आणि इतर फळं पिकवण्यासाठीही कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाइडमधून अ‍ॅसिटिलीन गॅस तयार होतो. याच गॅसमुळे फळं पिकतात.

कॅल्शियम कार्बाइडचे सेवन केल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम खालीलप्रमाणे...

1. उलट्या होणे

2. चक्कर येणे

3. अशक्तपणा 

4. गिळण्यासंदर्भातील समस्या 

5. चिडचिड होणे

6. जास्त तहान

7. अल्सर आणि इतर त्वचेच्या समस्या