नवी दिल्ली : पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानं सगळा देश हादरला. भारतीय सैन्यानं या हल्ल्याचा बदला घेतला तो अतिरेक्यांचा बालाकोटमधला संपूर्ण तळ नेस्तनाबूत करून... या हवाई हल्ल्याला आज २ वर्ष पूर्ण झाली.
बालाकोट एअरस्ट्राईकला 2 वर्ष पूर्ण
26 फेब्रुवारी 2019... ही तारीख आहे भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून येणारी... याच दिवशी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून आपल्या जाँबाज जवानांनी पुलवामामधील अतिरेकी हल्ल्याचा बदला घेतला. 1971च्या भारत-पाक युद्धानंतर प्रथमच वायूदलानं सीमा ओलांडली. भारताच्या 12 मिराज विमानांनी सीमेच्या आत 60 किलोमीटरवर हा हल्ला चढवला. या विमानांनी 6 बॉम्ब टाकले. यात जैश ए मोहम्मदचे कॅम्प आणि अल्फा 3 ही कंट्रोलरूम उद्ध्वस्त केली. अनेक जहाल अतिरेक्यांसह दहशतीचं ट्रेनिंग घेणाऱ्या किमान 300 जणांना कंठस्नान घालण्यात आलं.
घाबरलेल्या पाकिस्तानची आता शांततेची भाषा
अर्थात पाकिस्ताननं हे कधीच मान्य केलं नसलं तरी प्रत्यक्षदर्शींनी असंच घडल्याचं वारंवार सांगितलंय. शिवाय बालाकोटमुळे पाकिस्तान पुरता हादरलाय, हेदेखील स्पष्ट आहे. कारण आता अतिरेकी पाठवण्याऐवजी चर्चेतून सीमेवरचा तणाव निवळला पाहिजे, अशी भाषा पाकिस्ताननं सुरू केली आहे. LoC वर तणाव कमी करण्यासाठी DGMO स्तरावर नुकतीच चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं आहे.
त्यात शांतता आणि संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. नियंत्रण रेषेवरील सर्व क्षेत्रांमध्ये याचं पालन करण्याचंही पाकिस्ताननं मान्य केलं आहे. चर्चेतून निघालेल्या या तोडग्यावर विरोधकांनीही समाधान व्यक्त केलं आहे.
26 तारखेच्या पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी 21 मिनिटांचं हे धाडसी ऑपरेशन संपलं. पाकिस्तानला काय घडलंय याची कल्पना येण्यापूर्वीच भारताची मिराज विमानं परतलीही होती. ये नया हिंदुस्तान है, जो घुसेगा भी आणि मारेगा भी हे पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं.