द हेग: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक, आर्थिक आणि व्यापारी अशा सर्वच पातळ्यांवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने पाकिस्तानचा अतिविशेष राज्याचा ( मोस्ट फेवर्ड नेशन) दर्जा काढून घेतला होता. यानंतरही भारताकडून राजनैतिक स्तरावर पाकिस्तानला अजून काही धक्के दिले जाण्याची शक्यता आहे. भारताच्या या आक्रमक धोरणाचे प्रत्यंतर सोमवारी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात आले. पाकिस्तानने अटक केलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाहीर सुनावणी होत असून, एकूण चार दिवस ही सुनावणी चालणार आहे.
भारतातील प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे भारत सरकारच्या वतीने जाधव यांची बाजू मांडत आहेत. त्यांच्या दिमतीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारीही हेगच्या न्यायालयात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या विधिज्ञांची फौजही येथे आहे. या खटल्यापूर्वी न्यायालयात घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. न्यायालयात आल्यानंतर पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अन्वर मन्सूर भारतीय परराष्ट्र खात्यामधील अधिकाऱ्यांना भेटायला गेले. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव दिपक मित्तल यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. मात्र, मित्तल यांनी हस्तांदोलन करायला नकार देत अन्वर मन्सूर यांना दुरूनच नमस्कार केला. हा प्रसंग अनेक कॅमेऱ्यांनी टिपला. यानंतर सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा सुरु आहे. दिपक मित्तल यांची ही कृती म्हणजे भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या आक्रमक धोरणाचे द्योतक असल्याची चर्चा आहे. या साऱ्या प्रकारामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.
The Hague (Netherlands): Government of India's agent Deepak Mittal, Joint Secretary, MEA and Pakistan's AG Anwar Mansoor Khan before the proceedings in Kulbhushan Jadhav case at the International Court of Justice. pic.twitter.com/QmZntyMFKG
— ANI (@ANI) February 18, 2019
दरम्यान, हरीश साळवे यांनी हेगच्या न्यायालयात आज भारताची बाजू मांडली. यावेळी त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना सोडण्यात यावे, असे साळवे यांनी म्हटले. भारताची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यावर आता उद्या पाकिस्तानच्यावतीने खावर कुरेशी हे १९ फेब्रुवारीला युक्तिवाद करतील. नंतर भारत त्यावर २० फेब्रुवारीला उत्तर देईल. त्यानंतर पाकिस्तान २१ फेब्रुवारीला अंतिम म्हणणे मांडेल.