भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत; नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींचा इशारा

नजीकच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, याबाबत शंकाच आहे.

Updated: Oct 14, 2019, 10:46 PM IST
भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत; नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींचा इशारा title=

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत झाल्याचे मत नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले. अभिजीत बॅनर्जी यांना सोमवारी अर्थशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. यानंतर त्यांनी एका अमेरिकन वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. 

यावेळी बॅनर्जी यांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत पायावर उभी आहे. विकासदराची सध्याची आकेडवारी पाहता नजीकच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, याविषयी आपण साशंक असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या पाच वर्षांत आपल्याला विकासदर निदान थोडा तरी उंचावताना दिसला होता. मात्र, आता ती शक्यताही मावळली आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले. 

भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचे नोबेल

भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जी, त्यांची पत्नी इस्थर ड्युफ्लो आणि मायकेल क्रेमर या तिघांना संयुक्तपणे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी निर्मुलनाच्या प्रायोगिक संशोधनसाठी त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला. 

अभिजीत बॅनर्जी हे नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरले आहेत. यापूर्वी अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. कोलकाता येथील प्रेसिडेंसी आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) अभिजीत बॅनर्जी यांचे शिक्षण झाले आहे.

'अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नरसिंह राव- मनमोहन सिंगांचे मॉडेल वापरा'

नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर अभिजीत बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, मला इतक्या लवकर हा सन्मान मिळेल असा विचारही मनात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.