नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचलीय. प्रत्येक पक्षाचे शिलेदारही तयार झालेत. पण राजपथचा रस्ता निश्चित करण्यासाठीचे देशाचे मुद्दे कोणते? याच प्रश्नांना समोर ठेऊन घेऊन आयोजित करण्यात आलेल्या 'इंडिया का डीएनए' या 'झी न्यूज'च्या राजकीय महासंवादत भाजपचे उच्चपदस्थ 'चौकीदार' एकाच मंचावर दिसणार आहेत. सोमवारी १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. राजकीय मैदानावरचे मोठे खेळाडू आज 'झी न्यूज'च्या मंचावरून देशाशी संवाद साधणार आहेत.
भाजपच्या चौकीदारांच्या या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात विश्वासनीय चौकीदार अमित शाहदेखील असतील. यूपीमध्ये ७४ च्या पलिकडे आणि देशात ३०० च्या पलिकडे जाणार असा त्यांना आत्मविश्वास का? हे आणि असे अनेक प्रश्न या मंचावरून त्यांना विचारले जातील.
या संमेलनात देशाच्या संरक्षणमंत्री निर्माला सीतारमण, केंद्रीय कपडे मंत्री स्मृती इराणी, राज्यवर्धन सिंह राठोड हे सहभागी होतील. इतकंच नाही तर निवडणुकीरूपी महाभारतातल्या चौकीदारांसाठी चक्रव्युहाची रचना करणारे अखिलेश यादवही या महासंवादात सहभागी होतील.