नेत्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ; कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज

अनेक नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कर्नाटकच्या किनारपट्टी भागात 6 ते 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Updated: Aug 6, 2020, 05:22 PM IST
नेत्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ; कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज title=
फोटो सौजन्य : ANI

कर्नाटक : मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आसाम, बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पूराने मोठं नुकसान झालं आहे. आता कर्नाटकातही हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मँगलोरमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे मँगलोरमधील नेत्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

हवामान विभागानुसार, कर्नाटकच्या किनारपट्टी भागात 6 ते 10 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कर्नाटकातील शिवमोगामध्ये मुसळधार पावसामुळे भात शेती पावसाच्या पाण्याखाली गेली आहे. हवामान खात्याने या भागातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कर्नाटक शहरातील आणि आसपासच्या मुसळधार पावसामुळे हुबळीतील उनकल तलाव ओसंडून वाहत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी जिल्हा प्रभारी मंत्र्यांना राज्यभरातील मुसळधार पाऊस पाहता, खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी मंत्र्यांना आपल्या मतदारसंघात राहून नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देण्याचे निर्देशही दिले आहेत.