Weather Forecast: मुसळधार पाऊस, दरड आणि बरंच काही; पुढील काही दिवस धोक्याचे

मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

Updated: Jul 27, 2022, 07:44 AM IST
Weather Forecast: मुसळधार पाऊस, दरड आणि बरंच काही; पुढील काही दिवस धोक्याचे title=
IMD Monsoon updates Weather Forecast Maharashtra Konkan

मुंबई : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी येत्या काळात आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (IMD Monsoon updates Weather Forecast Maharashtra Konkan)

राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बुधवारसाठी पुण्यासह राज्यातील 18 जिल्ह्यांना IMD कडून इशारा देण्यात आलाय. 

मागील आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसानं हजेरी लावली. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं. तर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत पावसानं उसंत घेतली. मात्र आता हवामान विभागाकडून राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

देशात काय परिस्थिती? 
मंगळवारी जोधपूरमध्ये झालेल्या पावसानं गेल्या 20 वर्षांचा विक्रम मोडला. तिथे उत्तराखंडमध्येही पावसानं जोर धरला असून, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  उत्तरकाशी, बागेश्वर, नैनीताल देहरादून, चमोली, रुद्रप्रयाग पिथौरागढमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सदर परिसरात दरड कोसळण्याच्या घटनाही घडू शकतात असा इशारा देण्यात आल्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. 

मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्येही जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जम्मू काश्मीर परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळं या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्राही थांबवण्यात आली आहे.