'जयाप्रदांनी #MeToo म्हटलं तर आझम तुरुंगात जातील'

बॉलिवूड किंवा राजकीय क्षेत्र #MeToo पासून अस्पर्श राहिलेलं नाही...

Updated: Oct 18, 2018, 09:11 AM IST
'जयाप्रदांनी #MeToo म्हटलं तर आझम तुरुंगात जातील' title=

फिरोजाबाद : सोशल मीडियावर सुरू असलेल्या #MeToo कॅम्पेननं बॉलिवूडलाच नाही तर राजकीय क्षेत्रालाही काळजीत पाडलंय. त्यातच अमर सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे वेगळ्याच चर्चांणा उधाण आलंय. 'महिलांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्यांना मोदी सरकारमध्ये शिक्षा मिळणारच. मग तो मंत्री असो वा संत्री...' असं खासदार अमर सिंह यांनी म्हणतानाच #MeToo कॅम्पेनवरून अमर सिंह यांनी आझम खान यांच्यावर निशाणा साधलाय. 

'बॉलिवूड किंवा राजकीय क्षेत्र #MeToo पासून अस्पर्श राहिलेलं नाही... इथे असे अनेक लोक आहेत जे जगाच्या गप्पा मारतील पण ते आतून कसे आहेत? हे सांगता येणार नाही' असं त्यांनी म्हटलंय. 

पत्रकारांनी मग त्यांना आणखी काही प्रश्न विचारल्यानंतर सिनेक्षेत्रातून राजकारणात पाऊल टाकलेल्या जयाप्रदा यांचाही अशा काही लोकांशी सामना झाल्याचं अमर सिंह यांनी म्हटलंय. 'जयाप्रदांनी #MeToo म्हटलं तर आझम खानसारखे लोक तुरुंगात जातील' असं त्यांनी म्हटलंय. 

इतकंच नाही तर अमर सिंह यांनी स्वत:लाही #MeToo पासून धोका असल्याचं म्हटलंय. या कॅम्पेनचा चुकीचा वापर होऊ नये, असंही त्यांनी म्हटलंय.