पाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती

IAS Rinku Dugga Compulsorily Retired: मागील वर्षी ही महिला आयएएस अधिकारी चर्चेत आली होती जेव्हा तिने आणि तिच्या नवऱ्याने पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडू, प्रशिक्षकांना मैदानाबाहेर काढलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 27, 2023, 12:47 PM IST
पाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती title=
मागील वर्षी ही महिला आयएएस अधिकारी तिच्या वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आली होती

IAS Rinku Dugga Compulsorily Retired: केंद्र सरकारने आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. 54 वर्षीय दुग्गा या सध्या अरुणाचल प्रदेशमधील इंजीजीनस अफेर्सच्या प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होत्या. केंद्र सरकारने सक्तीने रिंकू दुग्गा यांना निवृत्त होण्यास सांगितल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. 'रिंकू दुग्गा यांच्या कामगिरीचा इतिहास पाहून त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील निर्देशही सरकारने जारी केले आहेत,' असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

कोणत्या नियमानुसार केली कारवाई?

रिंकू जुग्गा यांना केंद्रीय सेवा आयोग (पेन्शन) 1972 च्या नियमामधील 56 (जे) तरतुदीनुसार सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे. या नियमानुसार सरकार कोणत्या सरकारी कर्मचाऱ्याला जनहितार्थ अनिवार्य सेवानिवृत्ती देऊ शकते. 56 (जे) नुसार, कोणत्याही सरकारी कर्मचारीची कामगिरी योग्य नसेल, भ्रष्टाचार किंवा कामातील अनियमिततेसारखे आरोप असतील तर अशा कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांच्या कामांचा दर 3 महिन्यांनी आढावा घेतला जातो. 

या आढाव्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस पाठवली जाते. अथवा 3 महिन्यांचा पगार आणि भत्ता देऊन अनिवार्य निवृत्ती घेण्यास सांगितलं जातं. आयएएस रिंकू दुग्गा यांच्या प्रकरणामध्येही असाच काहीसा प्रकार झाला. 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, दुग्गा यांची कामगिरी अपेक्षेनुसार नसल्याचं रिव्ह्यूमध्ये समोर आलं. केंद्र सरकारने याच आधारावर त्यांना सक्तीची निवृत्ती देत असल्याचं नोटीफिकेशन जारी केलं आहे.

कोण आहेत रिंकू दुग्गा?

रिंकू दुग्गा या अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोरम केंद्रशाशित प्रदेश कॅडरच्या सन 1994 च्या बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत. मागील काही काळापासून त्या अनेकदा नको त्या कारणांमुळे चर्चेत आल्या आहेत. मागील वर्षी रिंकू दुग्गा आणि त्यांचे आयएएस पती संजीव खिरवार यांच्यावर दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर मनमानी कारभार केल्याचा आरोप करण्यात आला होता. आयएएस दांपत्याने आपला पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामं करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. सायंकाळी 7 वाजता या दांपत्याला स्टेडियमवर कुत्र्याला घेऊन फिरता यावं म्हणून सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना मैदानाबाहेर काढलं जायचं. खिरवार आणि दुग्गा यांच्या सांगण्यावरुन खेळाडू तसेच प्रशिक्षकांना वेगवेगळ्या कारणांसाठी त्रासही दिला जायचा. खेळाडूंच्या सरावासाठी तयार केलेल्या ट्रॅकवर हे दांपत्य कुत्रा फिरवायचे.

पतीला लडाखमध्ये तर पत्नीला अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवलेलं

दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवरील बातमी समोर आल्यानंतर केंद्र सरकारने संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची तडकाफडकी बदली केली होती. खिरवार यांना लडाखला पाठवण्यात आलेलं तर दुग्गा यांना अरुणाचल प्रदेशमध्ये नियुक्त करण्यात आलं होतं. खिरवार सुद्धा 1994 च्या बॅचलले अधिकारी आहेत. खिरवार आणि दुग्गा यांनी या प्रकरणानंतर स्पष्टीकरण देताना, स्टेडियम बंद झाल्यानंतर आपण कुत्र्याला तिथे फिरायला घेऊन जायचो, असा दावा केला होता. तसेच कुत्र्याला आम्ही ट्रॅकवर सोडत नव्हतो, असं सांगतानाच या दोघांनी आमच्याकडून खेळाडू आणि प्रशिक्षकांना त्रास दिला जात असल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं.