नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी आरोग्यासंदर्भात नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेचे उद्घाटन केल्यानंतर आणखी एका मोठ्या योजनेबद्दल त्यांनी माहिती दिली.
नागरिकांना आरोग्य सुविधा देणं हे नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनचे उद्दीष्ट आहे. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा रेकॉर्ड, देशभरातील खासगी डॉक्टर आणि आरोग्य सुविधांची माहिती पोहोचवली जाणार आहे.
व्यक्तीला कोणता आजार झाला होता हे कळण्याचा सध्या कोणता मार्ग नाही. आधारकार्ड आणि पॅनकार्डप्रमाणे आरोग्य ओळखपत्र देखील व्यक्तीकडे असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा मेडीकल रिपोर्ट असेल. यात व्यक्तीची प्रत्येक चाचणी, आजार, डॉक्टरचे नाव, औषध आणि रिपोर्ट्सची माहिती असेल.
देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तरी प्रत्येकवेळी रिपोर्ट सोबत नेण्याची गरज नाही. कारण तुमच्या आरोग्याची पूर्ण माहिती यावर असेल. युनिक आयडीने तुमच्या आरोग्याची पूर्ण माहीती डॉक्टरांना कळेल. आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरशी लिंक करुन तुम्ही हेल्थ आयडी बनवू शकता. एकदा बनवलेली आयडी डॉक्टर्स आणि रुग्णालयांना डिजीटल फॉर्ममध्ये शेअर करण्याची परवानगी असेल.
हेल्थ कार्डमध्ये १४ आकड्यांचा पोर्टेबल नंबर असेल. तुम्हाला हे १४ अंक लक्षात ठेवण्याची गरज नाही. या आयडीवरुनच काम होईल.
देशातील ६ केंद्रशासित प्रदेशांमध्ये याची सुरुवात होतेय. अंदमान निकोबार, चंदीगड, लडाख, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीप आणि पॉंडेचरीचा समावेश आहे. या केंद्र शासित राज्यांनंतर देशातील दुसऱ्या राज्यांमध्ये ही योजना सुरु करण्यात येईल.