ज्येष्ठ हिंदी साहित्यिका कृष्णा सोबती यांचे निधन

महिला सशक्तीकरण आणि स्त्री जीवनातील गुंतागुंतींचा आपल्या लेखनात उल्लेख

Updated: Jan 25, 2019, 03:35 PM IST
ज्येष्ठ हिंदी साहित्यिका कृष्णा सोबती यांचे निधन title=

नवी दिल्ली : प्रसिद्ध साहित्यिकार, लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कृष्णा सोबती यांचे आज निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. १८ फेब्रुवारी १९२५ रोजी गुजरात-पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. हा प्रांत आता पाकिस्तानमध्ये आहे. कृष्णा सोबती यांनी त्यांच्या लेखनातून महिला सशक्तीकरण आणि स्त्री जीवनातील गुंतागुंतींचा उल्लेख केला. सोबती यांना राजकीय, सामाजिक विषयांवर परखड मत मांडणाऱ्या लेखिका म्हणूनही ओळखले जायचे. २०१५ साली देशात असलेल्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे निराश होऊन साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता. 

सोबती यांच्या कुटुंबीय एकावली खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रूग्णालयात त्यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खलावत होती. त्यांनी गेल्या महिन्यात रूग्णालयात एका नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले होते. प्रकृती स्वास्थ्य उत्तम नसूनही सोबती नेहमी कला, रचनात्मक प्रतिक्रिया, जीवनावर चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

'जिंदगीनामा'साठी त्यांना १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. भारतीय साहित्यात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी २०१७ साली साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सोबती त्यांच्या जीवनात शेवटपर्यंत साहित्यिक कार्याशी जोडलेल्या होत्या.