मुंबई: देशभरात पावसानं जोरदार कमबॅक केला आहे. मात्र पावसाचा दुसरा डाव जीवघेणा ठरतो आहे. वीज कोसळून देशभरात 68 जणांचा बळी गेलाय. महाराष्ट्रावरही निसर्गाचं संकट घोंगावतं आहे.
रविवारची रात्र देशाच्या अनेक भागात काळरात्र ठरली. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार कमबॅक केलाय. पण या पावसानं अनेकांचे बळी घेतले. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात वीज कोसळून 68 जणांचा मृत्यू झाला. जयपूरमध्ये आमेर महल वॉच टॉवरवर वीज कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. तिथे काही पर्यटक आले होते.
एकीकडे उत्तर प्रदेशातही 41 जणांचा मृत्यू झाला. कानपूर, प्रयागराज आणि कौशांम्बी जिल्ह्यात निसर्गाचा रौद्रावतार पहायला मिळाला. मध्य प्रदेशातही 7 जणांचा बळी गेला. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात विजेनं अनेकांचे बळी घेतलेली आहेत.
तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यातही निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. इथल्या गोरेगावात एका घरावर वीज कोसळली, त्यात हे घर जळून खाक झालंय. सुदैवानं घरात कुणीच नसल्यानं मोठी जीवितहानी टळली.
वीज चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. उंच जागी थांबू नका. झाडाखाली आश्रय घेणं टाळा. धातूच्या वस्तूंपासून दूर राहा. विजा चमकत असताना मोबाईलचा वापर करू नका, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा वापर टाळा.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात पुरानं घरं आणि बाजारपेठेतील दुकानं पाण्याखाली गेलीत. रात्रभर जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात सध्या 10 ते 15 फुट इतकं पाणी आहे. स्थानिक स्वयंसेवक आणि नगरसेवकांनी इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. दरम्यान, अर्जुना आणि कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठेतील पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे लिगडाळ गावातले संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेलेत. या भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक मार्गावरची वाहतूक पूर्ण ठप्प झालीय. अनेक मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय.
निसर्गाचा कहर टाळणं आपल्या हाती नाही. मात्र त्यापासून बचाव करणं नक्कीच शक्य आहे. अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर सतर्क राहा..