लोकसभा निवडणूक २०१९: 'पानिपत'मधून भाजपचा मराठी शिलेदार रणांगणात?

हरियाणाच्या सत्तेची चावी जाट समाजाच्या हाती असते. पण करनाल लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या हाती उमेदवाराचं भवितव्य असतं. यंदा करनाल मतदारसंघातून मराठा उमेदवार उभा राहतोय.

Updated: Mar 4, 2019, 09:16 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९: 'पानिपत'मधून भाजपचा मराठी शिलेदार रणांगणात? title=

रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : हरियाणाच्या सत्तेची चावी जाट समाजाच्या हाती असते. पण करनाल लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या हाती उमेदवाराचं भवितव्य असतं. यंदा करनाल मतदारसंघातून मराठा उमेदवार उभा राहतोय.

करनाल मतदारसंघातून मराठा उमेदवार प्रदीप पाटील भाजपकडून तयारी करत आहेत. मराठा उमेदवार उतरल्यामुळे काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल आणि भाजपाची झोप उडाली आहे. पानिपत युद्धानंतर तिथेच स्थायिक झालेले रोड मराठा करनालमध्ये बहुसंख्य आहेत. त्यामुळे मराठा मतदार जो ठरवेल तोच उमेदवार लोकसभेत जातो. भाजपाचे विद्यमान खासदार अश्वीनी चोप्रा यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याने प्रदीप पाटील लोकसभा निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. 

करनालमध्ये भाजपा आणि काँग्रेसकडे एससी उमेदवार नसल्यामुळे मराठा उमेदवाराकडे लक्ष लागलं आहे. करनाल लोकसभा मतदारसंघात बाहेरचाच उमेदवार विजयी होतो. त्याशिवाय याच मतदारसंघात पानिपत विधानसभा मतदारसंघ येतो. करनालमध्ये १३८ गावांत मराठा समाज आहे.

मी करनालमध्ये ८ वर्षापासून राहतोय. सामाजिक कार्य सुरू आहे. परंतू राजकीय व्यासपीठ मिळालं तर आणखी काम करता येतं. इथल्या समस्या सोडवता येतात. रोड मराठा समाजाच्या अनेक अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पानीपतशी मराठ्यांची नाळ जोडलेली आहे. मराठा उमेदवार खासदार झाला तर महाराष्ट्राशी आणखी नाते घट्ट होईल, अशी प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली आहे.

करनाल मतदारसंघाचे खासदार अश्वीनी चोप्रा यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे. त्यातच आता याच मतदारसंघातून मनेका गांधी यांचंही नाव चर्चेत आलं आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा विधानसभा मतदारसंघही करनाल आहे. खट्टर यांना निवडून येण्यासाठी रोड मराठा मतदारांची गरज असते. त्यामुळे भाजप मराठा उमेदवार देण्याचा विचार करत आहे.

प्रदीप पाटील यांच्या रूपानं करनालच्या जनतेला पहिला मराठा खासदार मिळू शकतो. आता उमेदवार नेमक्या मनेका गांधी ठरणार की प्रदीप पाटील आणि कुणाच्या पारड्यात जनता मतं देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.