Trending News : गुजरातमधल्या मेहसाना (Mehasana) जिल्ह्यात एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. मेहसानामध्ये राहाणाऱ्या एका महिलेने बाळाला जन्म दिला. पण जन्मत:च बाळाची (Newborn Baby) तब्येत अचानक बिघडली. बाळावर तातडीचे उपचार सुरु करण्यात आले. पण तपासात जे आढळलं त्याने कुटुंबासह डॉक्टरही हैराण झाले. बाळाच्या शरीराचा रंग निळा पडला होता, शिवाय रक्तदाबही कमी झालं होता. डॉक्टरांनी बाळाला तात्काळ अहमदाबादमधल्या नवजात शिशूंच्या रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु केले.
बाळाच्या शरिरात तंबाखूचं प्रमाण
सुरुवातीला श्वास गुदमरल्याने बाळाची प्रकृती बिघडली असावी असं डॉक्टरांना वाटलं. पण बाळामध्ये असामान्य लक्षणं दिसत होती. त्यामुळे डॉक्टरांनी बाळाची पूर्ण तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तपासणीत बाळाच्या शरिरात मोठ्या प्रमाणावर तंबाखूचं (Nicotine) प्रमाण आढळलं. त्यामुळे बाळाच्या शरीराचा रंगच बदलल होता.
बाळाच्या शरीरात तंबाखूचं प्रमाण आढळल्यानंतर डॉक्टारांच्या यामागच्या कारणांचा शोध घेतला. यासंदर्भात स्त्री रोग तज्ज्ञांशीही चर्चा करण्यात आली. शोधात हैराण करणारं कारण समोर आलं. बाळाच्या आईला तंबाखू खाण्याचं व्यसन होतं. दिवसभरात ती 10 ते 15 वेळा तंखाखू खायची. परिणामी रक्ताद्वारे तंखाबू गर्भाशयापर्यंत गेलं.
आईला पश्चाताप
आईच्या तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे बाळाची सवय बिघडली. आपल्या वाईट सवयीवर आता आईने पश्चाताप व्यक्त केला आहे. वयाच्या 15 व्या वर्षांपासून या महिलेला तंबाखू खाण्याची सवय होती. पण या सवयीचे परिणाम आपल्या बाळाला भोगावे लागतील याचा तीने कधीही विचार केला नव्हता. बाळावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून पाच दिवसांनंतर बाळाच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. आता बाळाला दूध पाजताना तंबाखूचं सेवन करु नये असा सल्ला डॉक्टरांनी या महिलेला दिला आहे. आईच्या दुधामुळे बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
जागरुकतेची गरज
गुजरातमध्ये अनेक गावात तंबाखूचं सेवन करणं ही साधी गोष्ट मानली जाते. 2020 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात गुजरात राज्यातील 41 टक्के पुरुष आणि 8.7 टक्के महिला नियमात तंबाखूचं सेवन करत असल्याचं समोर आलं होतं. या सवयीचे परिणाम लहान मुलांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर जागरुकता अभियान राबवण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. धूम्रपान केल्याने बाळंतपणाच्या वयातील स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.