Unlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद ?

देशात १ ऑक्टोबरपासून अनलॉक ५ची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.  

Updated: Sep 28, 2020, 02:08 PM IST
Unlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद ? title=

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशात येत्या १ ऑक्टोबरपासून अनलॉक ५ची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अनलॉक ४ अंतर्गत देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने अनेक नियम शिथिल केले होते. आज देखील सरकारकडून  अनलॉक ५ अंतर्गत काही नियम शिथिल करण्याची परवानगी  दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

एकंदर देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकार कोणते नियम शिथिल करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर पोहोचली आहे, तर ५० लाख १६  लाख ५२१ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.  देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ इतकी झाली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनेक नियम शिथिल करत १ ऑक्टोबरपासून  चित्रपटगृहांना परवानगी दिली आहे. ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत १ ऑक्टोबर पासून नाटक, ओपन एअर थेअटर, चित्रपटगृह तसेच सर्व संगीताच्या कार्यक्रमांना  १ ऑक्टोबरपासून परवानगी दिली जाऊ शकते.

मात्र यावेळी नागरिकांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. ज्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे. एकंदर सरकारद्वारे घालून देण्यात आलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन करण्याचं देखील स्पष्ट करण्यात आले आहे. 

चित्रपटगृहांना परवानगी
अनलॉक ४ अंतर्गत मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा यांसारख्या गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क सुरु करण्यात आलेले नाही.  त्यामुळे आता चित्रपटगृहांना आज सरकार परवानगी देईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने चित्रपटगृह सुरु करण्यासंदर्भात परवानगी द्यावी अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र २१ सप्टेंबरपासून सरकारने ओपन एअर थेअटर सुरु करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे.

पर्यटन 
कोरोनामुळे देशातील पर्यटन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे अनलॉक ५ अंतर्गत  पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासंदर्भात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.  हिमाचल प्रदेश, उत्तराखंड याठिकाणी नियमांचे पालन करत पर्यटनाला मंजुरी दिली आहे.

शाळा
देशात ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णयाचे अधिकार सरकारने शाळांवर सोपावले आहेत. तर प्राथमिक वर्ग पुढील महिन्यांसाठीही बंद राहण्याची शक्यता आहे आणि ते ऑनलाइन सुरू राहतील.