Man Died Following Smile Designing Procedure: लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असतो. हा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी तरुण आणि तरुणी अनेक नवनवीन ट्रेंड फॉलो करतात. हा दिवस अविस्मरणीय असावा यासाठी स्वतःवरही अधिक लक्ष देतात. अनेक जण तर लग्नाच्या आठवड्यापासूनच ग्रुमिंगची तयारी करतात. पार्लर, सलोनमध्ये जाऊन त्वचेची नीट काळजी घेतात. लग्नातील लूक उठून दिसावा याची ही तयारी असते. असाच प्रयत्न हैदराबाद येथील एका तरुणाने केला मात्र यामुळं त्याला जीव गमवावा लागला आहे.
हैदराबाद येथील FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये डेंटल प्रोसीजरदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 28 वर्षांचा उद्योजक लक्ष्मी नारायण विंजाम याने लग्नात आपली स्माइल वाढवण्यासाठी डेंटल प्रोसीजर बुक केलं होतं. मात्र, त्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.
विंजाम यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी रोजी लक्ष्मी नारायण एकटेच स्माइल डिजायनिंगसाठी जुबली हिल्सच्या रोड नंबर-37 वर असलेल्या इंटरनॅशनल डेंटल क्लिनीकमध्ये गेला होता. संध्याकाळी जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला फोन केला तेव्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी फोन उचलून सांगितले की त्यांचा मुलगा या प्रोसीजर सुरू असताना बेशुद्ध पडला होता.
लक्ष्मीनारायणच्या वडिलांनी दावा केला आहे की, त्याला जवळच्याच रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. 16 फेब्रुवारी रोजी प्रोसीजरदरम्याम अॅनेस्थेशीयाचा ओव्हरडोस दिल्याने विंजाम बेशुद्ध पडले आणि ओव्हरडोसमुळं त्यांचा मृत्यू झाला.
जुबली हिल्स पोलिसांनी मयत लक्ष्मी नारायण विंजामच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन आयपीसी कलम 304 (निष्काळजीपणामुळं मृत्यू) अतर्गंत एफएम इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. पोलिस रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून त्यातून काही पुरावा मिळतोय का हे पाहत आहेत. लक्ष्मी नारायणच्या मृत्यूमुळं एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांनी त्याचे लग्न होते. मात्र, त्याआधीच कुटुंबांवर दुखांचा डोंगर कोसळला आहे.