दुसऱ्यांदा हज यात्रा करण्यावर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा विचार

एकापेक्षा जास्त वेळा हज यात्रेला जाण्यावर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.

Updated: Aug 17, 2017, 09:05 PM IST
दुसऱ्यांदा हज यात्रा करण्यावर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा विचार  title=

नवी दिल्ली : एकापेक्षा जास्त वेळा हज यात्रेला जाण्यावर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. नवीन हज निती २०१८ चं काम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीची हज यात्रा नव्या नितीनुसार होणार आहे. सारखं हज यात्रेला जाण्यापेक्षा आयुष्यात एकदाच हज यात्रेला जाण्याची तरतूद या नव्या नितीमध्ये होऊ शकते. गरीबातल्या गरीब व्यक्तीला हज यात्रेला जाता यावं यासाठी ही तरतूद करण्याचा मोदी सरकारची योजना आहे. सरकारच्या या नव्या नितीमध्ये हज यात्रा पुन्हा एकदा समुद्र मार्गानं सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

हज यात्रेमधल्या या प्रस्तावित बदलांबाबत अल्पसंख्याक कार्यमंत्रालयानं मुस्लिम प्रतिनिधींशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. सर्वोच्च न्यायलयानं २०१२ साली दिलेल्या आदेशाप्रमाणे हज यात्रेबाबतची ही नवी निती सरकार अवलंबणार आहे. यामुळे हज यात्रा स्वस्त, सुलभ आणि पारदर्शी होईल, असा विश्वास मंत्रालयानं वर्तवला आहे. हज यात्रेला मिळणारी सबसिडी बंद करण्याबाबतही या नितीमध्ये निर्णय होऊ शकतो.