मुंबई : सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ पाहायला मिळाली आहे. बुधवारी देखील सोनं महागलं आहे. सोन्याचा भाव कमी झाला की अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. लग्नसराईत मात्र सोनं चांगलंच महागतं. सध्या सोन्याची मागणी स्थिर आहे. पण भाव मात्र काही प्रमाणात कमी जास्त होत आहे. सोनं सध्या ३८ हजारांच्या घरात आहे. पण येत्या काळात आणखी सोनं महाग होण्याची शक्यता आहे.
आगामी काही महिन्यात सोन्याचा दर कमी होण्याची चिन्ह कमीच आहेत. भारतीय स्टेट बँके समुहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सोमैया कांती घोष यांच्या मते, 'भविष्यात सोन्याच्या दरात तेजी कायम राहू शकते. सोन्याचा भाव कमी होण्याची शक्यता नाही.'
आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींबद्दल सांगताना घोष यांनी म्हटलं की, 'हार्मुज जलडमरू, कोरिया द्वीप आणि तैवानमध्ये सुरु असलेल्या वादाचा परिणाम आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर आणि खास करुन भारतासाठी सकारात्मक नाही. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या ६ महिन्यात सोन्याचे भाव वाढतच आहेत. येणाऱ्या ६ महिन्यामध्ये देखील भाव कमी होतील याची शक्यता कमीच आहे. यावर्षी धनत्रयोदशीला सोनं ३९,००० रुपये प्रति १० ग्रॅम होतं. तर एका वर्षा पूर्वी सोनं ३२,६९० रुपये प्रति १० ग्रॅम होतं.'
'अनेक देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या वादामुळे व्यापारावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम', होत असल्याचं देखील घोष यांनी म्हटलं आहे. 'वाहन खरेदीमध्ये झालेली घट ही येणाऱ्या ३ महिन्यांमध्ये काय होईल याचे संकेत देत आहे.'