चांदीच्या दरात 1 हजारांची घट, दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Prices Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 8, 2024, 11:31 AM IST
चांदीच्या दरात 1 हजारांची घट, दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या  title=
Gold price today gold gets cheaper silver drops by 1000

Gold Prices Today: राज्यात व देशात फेस्टिव सीझनला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. याच आठवड्यात दसरा आहे. दसऱ्याच्या आधीच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर चांदीची चकाकीदेखील कमी झाली आहे. वायदे बाजारात आज मौल्यवान धातुचे भाव कोसळले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोनं आज जवळपास 220 रुपयांनी कमी झालं आहे. तर, चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घट झाली आहे. 

MCXवर सोनं आज 220 रुपयांनी घटले आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 7761 रुपये प्रतिग्रॅम इतके आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 200 रुपयांनी कमी झाल्याने प्रतिग्रॅम सोनं 7116 वर स्थिरावले आहेत. 24 कॅरेट सोनं गेल्या आठवड्यात -0.99 टक्क्याने बदलला आहे. तर, महिनाभरात -5.63 टक्क्यांनी बदलला आहे. आज चांदीच्या दरात हजार रुपयांच्या जवळपास घट झाली आहे. त्यामुळं चांदीचे दर 91.400 रुपये किलोग्रॅमवर स्थिरावले आहे. काल 92,357 इतका दर होता. त्यात आज 1.04 टक्क्यांनी घट झाले आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात, मजबूत डॉलरमुळे सोने 10 डॉलरने घसरले आणि 2670 डॉलरच्या जवळ पोहोचले, तर चांदी 32 डॉलरच्यावर  व्यवहार करत होती. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 77467 प्रतितोळा इतके आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 71,150 रुपये प्रतितोळा इतका आहे. 

वायदे बाजारात सोन्याचा दरात घट दिसत असली तरी सोन्याची चमक वाढताना दिसत आहे. सराफा व्यापाऱ्यांची खरेदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कलांमुळं सोमवारी सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. सोमवारी जरी सोन्याच्या दरात घट झाली असली तरी शुक्रवारपर्यंत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली होती. 

किरकोळ विक्रेत्यांकडून देशांतर्गत मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. व्यतिरिक्त शेअर बाजारातील घसरणीमुळे मौल्यवान धातूंच्या वाढीसही मदत झाली आहे. कारण गुंतवणूकदार आता सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडे वळले आहेत.