मुंबई : कोरोना संसर्गामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृष्य परिस्थिती आहे. सध्या लगीनसराईचा सिजन सुरू आहे. परंतु लॉकडाऊनमुळे नेहमीसारखे समारंभ आता होत नाहीत. भारतीय लग्नकार्यांमध्ये सोने खरेदीला मोठे महत्व असते. त्यामुळे या दिवसांमध्ये सोने खरेदीत तेजी असते. सध्या खरेदीदार ऑनलाईन किंवा ठराविक वेळेत सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहेत.
किरकोळ खरेदीदारांसह मोठे गुंतवणूकदार देखील सोन्यामध्ये सध्या गुंतवणूकीला प्राधान्य देत आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत. गुरूवारी सोन्याच्या दरात 300 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी जास्त होणारे भाव, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असतो.
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये सोन्याचे दर 48 हजार 439 रुपये प्रतितोळे इतका होता. MCX मध्ये कालच्या तुलनेत हा दर 130 रुपये प्रतितोळे घसरल्याचे दिसून आले. मुंबईतील 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार इतका होता. हा दर गेल्या 2-3 दिससांपासून स्थिर आहे.
सोन्याचे दर 60 हजारावर जाण्याची शक्यता
मोतीलाल ओसवाल फाइनाशिअल सर्विसेसच्या अहवालानुसार, 2021 मध्ये सोन्याच्या दरांमध्ये अनेकदा उतार चढ पहायला मिळाली. अनेक देशांमध्ये लसींना मिळालेली परवानगी, अमेरिकी निवडणूका, फार्मा कंपन्यांचे शेअर्स, डॉलरच्या किंमती कमी जास्त होणे आदीं कारणं सोन्याच्या दरात चढ उतार होण्यास कारणीभूत आहेत.
केडिया कमोडिटीच्या डायरेक्टर अजय केडिया यांच्या मतानुसार, सोन्यात येत्या काळात तेजी येण्याचे संकेत आहेत. जगभरातील कमी व्याजदरे, कोरोनाच्या बाबतीतील अनिश्चितता, अधिक लिक्विडिटीमुळे महागाईत वाढ, ईटीएफमध्ये खरेदी, केंद्रीय बँकांची सोन्यात खरेदी, डॉलरच्या किंमतीत घसरण, देशांमध्ये जिओ - पॉलिटिकल तणाव इत्यादी कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
-----------------------------------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)