Gaurikund Landslide : उत्तराखंडमध्ये क्षणात बदलणाऱ्या हवामानाचं रौद्र रुप पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. ज्यामुळं सध्या या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. केदारनाथ यात्रेतील मुख्य टप्पा असणाऱ्या गौरीकुंड येथील डाक पुलिया भागात दरड कोसळण्याची घटना घडली असून, या भागामध्ये आतापर्यंत 10 हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. ज्यानंतर लगेचच त्यांनी या पर्वतीय भागामध्ये शोधकार्य हाती घेतलं. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळं या भागात शोधकार्यातही अडचणी येत असल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे. मुख्य बाब म्हणजे डाक पुलिया भागापासून नजीकच वाहणाऱ्या नदीची पाणीपातळीही वाढली असल्यामुळं बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याच्या कामाला वेग आला आहे.
गौरीकुंड येथे रात्री उशिरा भूस्खलनाची माहिती मिळताच संबंधित भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुद्रप्रयागच्या एसपींकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्यापही बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचं कार्य सुरु आहे. गौरीकुंड हा भाग चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचा टप्पा असून, त्याचं नाव पार्वतीच्या नावावरून ठेवम्यात आलं आहे. केदारनाथ मंदिराच्या मार्गावर जाण्यासाठी गौरीकुंड प्रमुख तळांपैकी एक आहे.
दरम्यान सध्या उत्तराखंडमध्ये पावसामुळं अडचणीची परिस्थिती उदभवताना दिसत आहे. मंदाकिनी नदीची पाणीपातळी वाढल्यामुळंही नदीपात्राजवळ असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं रुद्रप्रयाग येथे पुढील 24 तासांसाठीसुद्धा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.