उंदराच्या Emergency Alert ने पोलिसांना फुटला घाम, नक्की काय आहे हे प्रकरण

एका उंदराने नुसतं बँकेतच नाही तर पोलिस स्टेशनमध्ये देखील खळबळ उडाली. 

Updated: Jul 16, 2021, 09:53 PM IST
उंदराच्या Emergency Alert ने पोलिसांना फुटला घाम, नक्की काय आहे हे प्रकरण title=

बिलासपूर : एखादा उंदीर जरी आपल्या घरी घुसला तरी तो आपलं संपूर्ण घर हलवून टाकतो. मग विचार करा जर तो एका बँकेत घुसला तर? लोकं किती हैराण होतील? आणि बँकेचं किती नुकसान होईल. अशीच एक घटना गौतम बौद्ध नगरच्या दनकौर येथील एका बँकेमध्ये घडली आहे. इथे एका उंदराने नुसतं बँकेतच नाही तर पोलिस स्टेशनमध्ये देखील खळबळ उडाली. कारण या उंदराने बँकेच्या सुरक्षा कक्षात प्रवेश केला, ज्यामुळे ऑटोमेटिक कॉल पोलिसांपर्यंत पोहोचला.

खरेतर जेव्हा बँकेचा ऑटोमेटिक कॉल पोलिस स्टेशनमध्ये पोहचतो याचा अर्थ असा की, चोरट्यांनी बँकेत प्रवेश केले आहे किंवा काही Emergency परिस्थिती आहे. त्यामुळे असा कॉल मिळताच पोलिस अलर्ट झाले आणि त्यांनी बँकेला घेराव घालण्यासाठी योजना सुरुवात केली.

पोलिसांनी ही माहिती या बँकेच्या अधिकाऱ्याला दिली. तेव्हा बँकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बँकेच्या सुरक्षा कक्षाचा दरवाजा उघडण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण तयारी केली. परंतु दरवाजा उघडताच सगळ्यांना धक्का बसला कारण, आता सगळ काही सामान्य होतं. 

ज्या मशीनमधून माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि त्यांना कॉल गेला होता, त्या मशीनची पोलिसांकडून तपासणी केली असता, त्यांना असे आढळले की, मशीनमध्ये उंदीर गेला होता. हे समजल्यानंतर पोलिसांनी आणि बँक अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

यानंतर या उंदराला बाहेर काढण्यात आले. खरेतर या घटनेच्या एक दिवस आधी बिलासपूर येथून चोरट्यांनी एटीएम तोडून त्यातून 17 लाख रुपये चोरले होते.

खरेतर ही चोरी गौतम बौद्ध नगर जिल्ह्यातील बिलासपुर शहरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) बाहेरील एटीएम बूथमधून केली गेली. ही बँक पोलिस स्टेशच्या जवळच्या परिसरात आहे, परंतु तरीही ही चोरी झाली असल्यामुळे चौकी प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे.

ज्यामुळे सगळे पोलिस या चोरट्यांच्या मागे लागले. त्यात या दुसऱ्या एका बँकेतून ऑटोमेटिक कॉल आल्यामुळे आणखी काय विपरीत घडणार या कारणांमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती. परंतु त्यात फक्त उंदीर गेला असल्याचे समजताच पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आणि पुन्हा या पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम चोरट्यांना शोधण्यासाठी सज्ज झाले.