दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा कडाडल्या आहेत. सलग दोन दिवस 80 पैशांच्या वाढीनंतर शुक्रवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून या नवीन किमती लागू झाल्या आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे, राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 97.01 रुपये प्रति लिटरवरून 97.81 रुपये प्रति लीटर इतकी झाली आहे. त्याच वेळी, डिझेलची किंमत 88.27 रुपये प्रति लिटरवरून 89.07 रुपये झाल्याची नोंद आहे.
गेल्या दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 1.60 रुपयांनी वाढले आहेत. त्यानंतर आता तिसऱ्यांदा 80 पैशांच्या वाढीनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.40 रुपयांची वाढ होणार आहे.
यापूर्वी 22 मार्च आणि 23 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.