गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनामानाट्यामुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत

असं आहे निवडणुकीचं गणित  

Updated: Mar 16, 2020, 03:03 PM IST
गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनामानाट्यामुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत title=

मुंबई : एकीकडे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार कोसळण्याची चिन्हं असतानाच गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदारांच्या राजीनामानाट्य रंगलं आहे. काँग्रेसच्या चार आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारल्याची माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली. तर आणखी एक-दोन आमदार लवकरच राजीनामे देतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या संशयकल्लोळात काँग्रेसनं आपल्या ३७ आमदारांना जयपूरमध्ये हलवलं आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा बंडाळी झाली आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्यानं पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जे. व्ही. काकडिया, सोमाभाई पटेल, मंगल गावित, प्रद्युम्न जडेजा आणि प्रवीण मारू हे पाच आमदार राजीनामा देतील अशी चर्चा होती.

आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांनी सावध पवित्रा घेत उर्वरित आमदारांना काँग्रेस सरकार असलेल्या राजस्थानात हलवलं. काँग्रेसनं आधी १४ आणि नंतर २३ अशा ३७ आमदारांना जयपूरमध्ये सुरक्षित ठेवलं असलं तरी आणखी आमदार राजीनामे देतील का ? किंवा काही आमदार प्रत्यक्ष निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करतील अशी भीतीही काँग्रेस नेत्यांना आहे.

असं आहे निवडणुकीचं गणित

गुजरातमधून चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता आहे. भाजपकडे एकूण १०६ मतं आहेत, तर काँग्रेसकडे जिग्नेश मेवाणींसह ६९ मतं आहेत. भाजपनं तीन उमेदवार निवडणुकीत उतरवले असून काँग्रेसनं शक्तिसिंह गोहिल आणि भरतसिंह सोळंकी यांना उमेदवारी दिली आहे. सध्याचं संख्याबळ पाहता भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकेल. तर भाजपचा तिसरा उमेदवार दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला क्रॉस व्होटिंगची भीती असून काँग्रेस आमदारांनी मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग केलं तर सगळं गणित बिघडू शकतं. त्यामुळे काँग्रेसनं चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर ३७ आमदारांना जयपूरला हलवलं आहे. काँग्रेस नेते आमदारांवर नजर ठेवून असले तरी आमदारांच्या राजीनाम्यांमुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्ष अडचणीत सापडला आहे. भाजपनं याचा पुरेपुर फायदा उठवत, आपल्या तीनही जागा सहज निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.