कुटुंबीयांना विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने मारेकऱ्यांना दिली स्वत:चीच सुपारी

रस्त्यात त्यांनी स्वत:चा फोटो व्हॉटसअॅपवरून मारेकऱ्यांना पाठवला. 

Updated: Jun 15, 2020, 10:13 PM IST
कुटुंबीयांना विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने मारेकऱ्यांना दिली स्वत:चीच सुपारी title=

नवी दिल्ली: आपल्या कुटुंबीयांना विम्याचे पैसे मिळावेत म्हणून दिल्लीतील एका व्यापाऱ्याने सुपारी देऊन स्वत:चीच हत्या करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १० जूनला गौरव बन्सल या व्यापाऱ्याचा मृतदेह पोलिसांनी झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यांचे हात पाठीमागे बांधले होते. यानंतर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु झाला होता. यादरम्यान पोलिसांना चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समजल्या. गौरव बन्सल यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज होते. या कर्जातून कुटुंबीयांची सुटका व्हावी आणि त्यांना पैसे मिळावेत, यासाठी गौरव बन्सल यांनी स्वत:च्याच हत्येची सुपारी देऊ केली. यानंतर चार मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. या सगळ्याचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला.

गौरव बन्सल हे आईपी एक्स्टेंशन परिसरात राहत होते. १० जूनला त्यांच्या पत्नीने आनंद विहार पोलीस ठाण्यात आपले पती गायब झाल्याची तक्रार केली होती. ९ जूनला ते दुकानात गेले, ते परत आलेच नाहीत, असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे होते. व्यापारात झालेल्या नुकसानामुळे गौरव बन्सल डिप्रेशनमध्ये होते. त्यांच्यावर मध्यंतरी उपचारही झाले होते. 

फेब्रुवारी महिन्यात गौरव बन्सल यांनी बँकेतून सहा लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून कोणीतरी परस्पर साडेतीन लाख रुपये खर्च केले होते. मयूर विहार पोलीस ठाण्यात याची तक्रारही करण्यात आली होती. त्यामुळे गौरव बन्सल तणावाखाली होते.

दरम्यान, बन्सल यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी फोन रेकॉर्ड तपासले असता गौरव यांनी हत्येपूर्वी एका अल्पवयीन मुलाला संपर्क साधल्याचे उघड झाले. या मुलाला त्यांनी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली. ठरवल्यानुसार ९ जूनला गौरव बन्सल आपली कार घरीच ठेवून रणहौला येथे पोहोचले. रस्त्यात त्यांनी स्वत:चा फोटो व्हॉटसअॅपवरून मारेकऱ्यांना पाठवला. यानंतर गौरव रणहौला येथे पोहोचले तेव्हा मारेकरी त्यांची वाट पाहतच होते. मारेकऱ्यांनी त्यांना पकडून त्यांचे हात बांधून टाकले. यानंतर त्यांच्या गळ्यात फास टाकून त्यांना झाडाला लटकवले. 

याप्रकरणी पोलिसांनी मनोज कुमार यादव, सूरज आणि सुमीत कुमार यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या हत्येसाठी मारेकऱ्यांना किती पैसे देण्यात आले होते, गौरव यांच्या डोक्यावर किती कर्ज होते, याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.