शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात 'गाव बंद'चा मोठा परिणाम, १० जूनला भारत बंद

मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आधी गावात सुरु झालेले हे आंदोलन व्यापक होत आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम तीन शहरांवर झालाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 2, 2018, 09:16 AM IST
शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात 'गाव बंद'चा मोठा परिणाम, १० जूनला भारत बंद title=

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाचा प्रभाव दिसून येत आहे. आधी 'गाव बंद'ची हाक देण्यात आली होती. पहिल्याच दिवशी या आंदोलनाचा परिणाम दिसू लागलाय. या शेतकरी आंदोलनाला व्यापक स्वरुप आलेय. या आंदोलनामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झालेय. तीन शहरांत फळे, दूध, भाजी पोहोचलेली नाही. दरम्यान, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने १० जूनला भारत बंदची हाक दिलेय. दरम्यान, महाराष्ट्रातही शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला मोठे स्वरुप प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत.

भारत बंदची दिली हाक

गतवर्षी ६ जून रोजी मंदसौर जिल्ह्यात शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार करत मारहाण केली होती. यात सात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला वर्ष झाल्याने शेतकऱ्यांनी १० दिवसांचे आंदोलन सुरु केले आहे. देशात अन्य राज्यांप्रमाणे मध्यप्रदेशात शुक्रवारी पहिल्या दिवशी 'गाव बंद' आंदोलन केले. याचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. राजधानी भोपाळ, मंदसोर आणि राज्यात अन्य भागात शेतकरी आंदोलन सुरु झालेय. त्यामुळे याचा परिणाम हा शहरांवर दिसत आहे. शहरात भाजीपाला, फळे आणि दूध पुरवठा होऊ शकलेला नाही. शेतकऱ्यांनी आंदोलनात एकजूट दाखवून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केलाय. दरम्यान, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे अध्यक्ष अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनी १० जूनला भारत बंदची घोषणा केलेय. याआंदोलनात शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेय. त्यामुळे हे आंदोलन देशात पसरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात शेतकरी संपावर

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्याचा परिणाम दिसून लागला आहे. त्यामुळे आता देशातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी १ जूनपासून संपावर गेला आहे. किसान सभेच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुंबईतील दादर मार्केटमध्ये निम्म्याच भाजीपाला गाड्या शनिवारी सकाळी दाखल झाल्या. भाजीपाल्याच्या गाड्या कमी आल्याने आता मार्केटमध्ये भाजांच्या दर वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. पुढील दहा दिवस हा संप जर सुरु राहिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे.