बंगळुरु : साध्या कपड्यातल्या शेतकऱ्यांचा गट महिंद्रा शो रुममध्ये गेले आणि सेल्समनने शेतकऱ्यांचा अपमान केला. हा अपमान हा पुढे चांगलाच महागात पडला. या घटनेचा शेवट झाल्यावर सर्वांना पटतंय सर्वांचा नाद करायचा, पण शेतकऱ्यांचा नाही. हा प्रसंग देशभरात चर्चेचा विषय झाला आहे.
विशेष म्हणजे महिंद्रा पिकअप ही गाडी सर्वात जास्त शेती आणि शेतीमालाशी संबंधित गोष्टींसाठी वापरली जाते, यावरुन हा अधिक चर्चेचा विषय झाला आहे. कारण शेतकऱ्यानेही ही गाडी खिशातून पैसे काढून चॉकलेट विकत घ्यावं तशी घेतली. हा किस्सा इथंच संपलेला नाही खूपच रंजक आणि स्वाभिमान जागृत करणारा आहे.
शेतकरी हा नेहमीच साधी राहणी आणि उच्च विचारसरणीत असतो. मातीत काम करण्यात त्याला कपड्यांचं भान नसतं, आणि सर्वांचं ऐकून घ्यायचं, अशा भूमिकेत त्याची विचारसरणीही उंचावलेली असते, आणि निसर्गचक्राचा सतत मार खाऊन... खाऊन त्याच्यात प्रचंड सहनशीलता आलेली असते. पण ती पाहण्याची गोष्ट नाही की, जी सेल्समनसारख्या माणसाला सतत चमकत्या काचेच्या शोरुमध्ये बसण्याच्या सवयीनं दिसेल.
कर्नाटकातील तुमाकुरू इथल्या महिंद्रा शोरुममध्ये शेतकऱ्यांचा एक गट नवीन पिकअप ट्रक खरेदी करण्यासाठी आला. नेहमीच चकाचक कपडे घालून आलेले ग्राहक पाहण्याची सवय असलेल्या सेल्समनना साधे शेतकरी पाहून गंमत करण्याची लहर आली. खरं तर चकाचक कपड्यात येणारे काही ग्राहक नंतर फायनान्स कंपन्यांची दाढी धरुन गाडी विकत घेतात, हे सेल्समन विसरलेच होते.
साधे शेतकरी, कुतुहलाने इकडे तिकडे पाहत शो रुम न्याहाळणारे, कोणतीही वस्तू आपली नाही, म्हणून हात न लावताच नम्रपणे माहिती विचारत होते, पण त्यांच्या नम्रतेतही सेल्समनला गरीबी दिसत असावी. म्हणून त्यांनी या मनाने श्रीमंत असणाऱ्या शेतकऱ्यांची फिरकी घ्यायला सुरुवात केली.
यात एका सेल्समनने तर खिल्ली उडवली आणि ती हद्द होती...बस्स...शेतकरी आतून पेटून उठला, कारण त्याला टोमणा मारला तो त्याच्या जिव्हारी लागला. सेल्समन म्हणाला, ''काय माहिती विचारताय, तुमच्या खिशात १० रुपये तरी आहेत का? ही गाडी १० लाखाची आहे''
शेतकऱ्याच्या तोंडाकडे पाहून कर्मचारी हसत होते. पण शेतकरी कॅम्पे गौडा यांना सेल्समन म्हणाला, ''काय माहिती विचारतो, तुझ्या खिशात १० रुपये तरी आहेत का? ही गाडी १० लाखाची आहे'', ''तू ३० मिनिटात १० लाख आणले तर तू हवी ती गाडी शोरुममधून माग तुला देऊन टाकू''
शेतकरी म्हणतो, ''सर्व माझ्याकडे बघून हसत होते, पण शोरुममध्ये कुणीच आमची बाजू घ्यायला आलं नाही किंवा त्यांना समजावलं नाही.''
शेतकरी कॅम्पे गौडा यांनी गाडी बूक करण्यास सांगितली आणि पुढच्या ३० मिनिटात शोरुमध्ये १० लाख जमवण्याची सोय केली आणि जमले ३० मिनिटात १० लाख आणि गौडा यांनी चॉकलेट विकत घ्यावं, तसं सेल्समनला सांगितलं, 'हे घ्या १० लाख आणि द्या १ गाडी'.
कर्मचाऱ्यांची सर्व मस्ती एका क्षणात उतरली होती. कारण १० लाखाची गाडी शेतकऱ्याने चौकातल्या दुकानदारकडे पैसे देऊन चॉकलेट मागावं तशी गाडी मागितली, पण शेतकऱ्याला लगेच द्यायला गाडी शोरुमकडे नव्हती, त्यांनी शेतकऱ्याची विनवणी करुन फक्त ३ दिवस द्या, आम्ही तुम्हाला गाडी देतो, कारण वेटिंग फार आहे, असं कारण सांगितलं.
कॅम्पे गौडा म्हणाले की हे प्रकरण कायदेशीर सोडवण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचा विचार होता. पण या घटनेनंतर कॅम्पे गौडा आणि इतर शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून तुम्ही माझ्याशाच नाही, तर कोणत्याही शेतकऱ्यांशी कधीही अशा पद्धतीने वागणार नाही याचं असं वचन घेतलं.